मैदानावर भिडणाऱ्या कोहली-गंभीरची खुमासदार मुलाखत; पत्रकार बनून एकमेकांचे पाय खेचले, Video viral

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही सामने चेन्नईत रंगणार आहेत. 19 सप्टेंबर पासून पहिला सामना सुरू होईल. तत्पूर्वी टीम इंडियाचा रनमशील विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात दोघेही पत्रकार बनून एकमेकांचा पाय खेचताना दिसत आहे.

बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मुलाखतीचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात दोघेही एकमेकांच्या खास खेळींचा उल्लेख करतात. यादरम्यान कोहली गंभीरला असा प्रश्न विचारतो की तो ऐकून गंभीर खळखळून हसतो.

मुलाखतीदरम्यान दोन्ही दिग्गज खेळाडूंनी त्यांचे मन मैदानावर कसे काम करते हे सांगितले. विशेष म्हणजे आयपीएल दरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांशी भिडले होते. त्यानंतर दोघांमधून विस्तवही जात नव्हता. पुढे दोघांना सामोपचाराने प्रकरण मिटवले आणि आता गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्यामुळे दोघांमधील वाद पूर्णपणे मिटल्याचे दिसत आहे.

गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची आठवण काढली. या दौऱ्यात कोहलीने धावांचा पाऊस पाडला होता. 2014-15 मध्ये टीम इंडियाचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तिथे कोहलीने चार शतकांसह 692 धावा कुटल्या होत्या. तसेच गंभीरने न्यूझीलंडविरुद्ध नेपियरमध्ये खेळलेल्या स्वत:च्या खेळीचाही उल्लेख केला. त्यावेळी गंभीरने दोन दिवस मैदानावर शड्डू ठोकून सामना अनिर्णित राखण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

त्या लढतीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 619 धावांचा डोंगर रचला होता आणि हिंदुस्थानचा पहिला डाव 305 धावांमध्ये गुंडाळत मोठी आघाडी घेतली होती. न्यूझीलंडने हिंदुस्थानला फॉलोऑन दिला. हिंदुस्थान सामना गमावणार असे वाटत असताना गंभीर धावून आला आणि त्याने खेळपट्टीवर नांगर टाकत 436 चेंडूंचा सामना करत 137 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. या खेळीच्या बळावर हिंदुस्थानने सामना अनिर्णित राखत मालिका 1-0 अशी जिंकली होती. ती आठवण काढत गंभीर म्हणाला की, मला नाही वाटत मी पुन्हा आयुष्यात तशी खेळी करू शकलो असतो.

यादरम्यान कोहली गंभीरला विचारतो की, विरोधी खेळाडूंशी पंगा घेतल्यावर प्रेरणा मिळते का? याला उत्तर देताना गंभीर म्हणतो की, माझ्यापेक्षा जास्त पंगा तू घेतो. याचे उत्तर तूच चांगल्याप्रकारे देऊ शकतो. यानंतर दोघेही मनमोकळेपणाने हसतात. त्यानंतर कोहली हसतच म्हणतो की, मी तर हे पाहत होतो की माझ्या एखाद्या बोलण्याशी तुम्ही सहमत आहात की नाही. हे चुकीचे आहे असे मी बोलणार नाही. पण कुणीतरी हे योग्य आहे बोलणारे हवेच ना, असेही कोहली म्हणतो.