अरेरे… तुटपुंज्या पेन्शनसाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगत जावे लागले, 80 वर्षीय वृद्ध महिलेची अधिकाऱ्यामुळे फरफट

ओडिशा राज्यात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला पेन्शनसाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगत जाण्याची वेळ आली. पेन्शन कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या हट्टीपणामुळे या महिलेची फरफट झाली आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटिजन्सनी अधिकाऱ्याच्या या हेकेखोरीवर सडकून टीका केली आहे. ओडिशातील रायसुआन गावात राहणाऱ्या पाथुरी देहुरी यांचे वय आता 80 वर्षे आहे. आजार असल्याने त्यांना नीट चालता येत नाही. त्या खाली बसून हाताचा आधार घेत चालतात. उदरनिर्वाहसाठी पेन्शन आहे. पेन्शन हवे असेल तर तुम्हाला कार्यालयात यावे लागेल, असा अट्टहास एका अधिकाऱ्याने केला. पाथुरी देहुरी यांचा नाईलाज झाला. आम्ही पेन्शनच्या पैशातून आमचा रोजचा खर्च भागवतो. पंचायत विस्तार अधिकारी (पीईओ) यांनी मला पेन्शनचे पैसे घेण्यासाठी कार्यालयात येण्यास सांगितले होते. पेन्शन वाटपासाठी घरी कोणीही आले नाही, तेव्हा पंचायत कार्यालय गाठण्यासाठी 2 किलोमीटर रांगण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, असे पाथुरी देहुरी यांनी सांगितले.

पेन्शन आणि रेशन घरपोच देऊ

वयोवृद्ध महिलेची फरफट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पुढील महिन्यापासून महिलांना पेन्शन आणि रेशन घरपोच देऊ, असे सरपंचाने म्हटले आहे. तर जे लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचू शकत नाहीत त्यांना पेन्शन घरी जाऊन देण्याची सूचना आम्ही पीईओंना केली आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

सोशल मीडियावरून अधिकारी ट्रोल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पेन्शनसाठी वयोवृद्ध महिलेला कार्यालयात बोलावणाऱ्या अधिकाऱ्याला नेटिजन्सनी चांगलेच ट्रोल केले आहे. 80 वर्षीय महिलेला चालता येत नाही. ती आजारी आहे. खुर्चीचा आधार घेत ही महिला दोन किलोमीटरपर्यंत चालत येते. याची जाणीव अधिकाऱ्यांना असायला हवी, अधिकाऱ्यांनी माणुसकी विसरू नये, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावरून व्यक्त केल्या.

u गेल्यावर्षीही ओडिशातून अशीच एक घटना समोर आली होती. एका वृद्ध महिलेला पेन्शन आणण्यासाठी कडक उन्हात बँकेत जावे लागले होते. खुर्चीचा आधार घेत तिला कार्यालयात जावे लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महिलेचा व्हिडिओ शेअर करून बँकर्सनी माणुसकी दाखवायला हवा, असे बँकेला उद्देशून म्हटले होते.