हँडल विदाऊट केअर, सिद्धू भडकला

अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मराठीसह बॉलिवूडच्या बडय़ा अभिनेत्यांसोबत त्याने काम केले आहे. अनेकदा सोशल मीडियावरून तो चाहत्यांशी कनेक्ट राहतो. आज त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ जरा वेगळा होता. एका नामांकित कंपनीच्या विमानातून प्रवास करताना  आलेला वाईट अनुभव सिद्धार्थने सांगितला.  मुंबई ते गोवा दरम्यान विमान प्रवासानंतर सिद्धार्थच्या हाती तुटलेली बॅग आली. त्यामुळे सिद्धू भडकला. ‘हँडल विथ केअर असं म्हटलं जातं. पण इथे माझ्या बॅगेची एवढी काळजी घेतलेय की बॅगेचं फक्त हंडल राहिलंय…’ असे त्याने उपरोधिकपणे म्हटले आहे.

व्हिडियोमध्ये सिद्धार्थ  म्हणतो, ‘नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता नुकताच इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही स्वतःच बघा त्यांनी माझ्या बॅगेची कशी काळजी घेतली आहे. या लोकांनी फक्त माझ्या बॅगेचं हँडलच नीट ठेवलंय. बाकी तुम्हीच माझी संपूर्ण बॅग बघा. इंडिगो तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतलीये हे पाहून मला छान वाटलं.’ या व्हिडियोला त्याने संतापजनक इमोजी जोडून संबंधित विमान कंपनीला टॅग केले.

हा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांनी कमेंट्स करून विमान कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेय. विमान पंपन्याच्या गलथान कारभारा वर ताशेरे ओढले.

अशातच इंडिगो कंपनीनेही सिद्धार्थच्या व्हिडियोवर रिप्लाय दिला आहे. ‘मिस्टर जाधव तुमची बॅग खराब झालेय. याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय. आम्ही या प्रकरणाची त्वरीत दखल घेऊन. कृपया तुमचा फोन नंबर आणि फोन करण्याची वेळ मेसेज ( डीएम) करा, असा रिप्लाय इंडिगोने केलाय.

‘ज्या पद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतलीये हे पाहून मला छान वाटलं.’

नवी बॅग मिळाली

सिद्धार्थच्या व्हिडियोची जोरदार चर्चा झाल्यावर या प्रकरणारची  इंडिगो कंपनीने दखल घेतली आहे.  कंपनीकडून दिलगिरी करून सिद्धार्थला त्याच्या नुकसान झालेल्या बॅगऐवजी नवीन बॅगही देण्यात आली आहे. याचाही एक व्हिडीओ सिद्धार्थने  शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने ‘इंडिगो कंपनी तुम्ही दिलेल्या जलद प्रतिसादाबद्दल धन्यवाद’ असे म्हणत आभार मानले आहेत.