इंग्लंडमध्ये चाकू हल्ल्यात तीन मुलांचा मृत्यू, मशिदीबाहेरील निषेधाच्या आंदोलनात हिंसा

इंग्लंडमध्ये एका अल्पवयीन तरुणाने डान्स क्लासमध्ये आठ मुलांना चाकूने भोसकलं. त्यात तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ एका मशिदीजवळ काही लोक जमा झाले. या घटनेविरोधात आंदोलन करताना जमाव हिंसक झाला. या जमावाने पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केले. पोलिसांच्या गाडीला आग लावली आणि पोलिसांच्या दिशेने काचेच्या बाटल्या फेकल्या.


मिळालेल्या माहितीनुसार हा जमाव इंग्लिश डिफेन्स लीग संघटनेचा होता. ब्रिटनच्या साऊथपोर्टमध्ये ही घटना घडली आहे. काल झालेल्या चाकू हल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. आता या हिंसक आंदोलनामुळे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे.

 


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आंदोलक नो सरेंडर आणि इंग्लिश टिल डाय अशा घोषणा देत होते.

ज्या 17 वर्षीय मुलाने चाकू हल्ला केला त्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचाच गैरफायदा घेऊन काही समाजकंटकांनी हिंसा पसरवली असेही पोलिसांनी म्हटले.