लढाई अजून संपलेली नाही!, विनेशने दिले निवृत्ती माघारीचे संकेत

माझ्या आयुष्याची लढाई खूप मोठी आहे. आमची लढाई अजून संपलेली नाही. आता केवळ एक छोटासा टप्पा मी गाठलाय. तोसुद्धा अपूर्णच राहिलाय. एका वर्षापेक्षा अधिक मी लढतेय. ती पुढेही कायम राहील. ज्या कुस्तीला मी सोडणार होती किंवा सोडलेय. मी त्याबद्दल आता काहीही बोलू शकत नाही. पण आज माझ्या गावकऱ्यांनी जे प्रेम दिलेय त्यामुळे मला खूप बळ मिळाल्याची भावना कुस्तीपटू विनेश फोगाटने व्यक्त केलीय.

नुकत्याच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन वाढीमुळे पदक गमावण्याचे दुःख भोगणाऱ्या विनेश फोगाटचे शनिवारी मायदेशात न भूतो न भविष्यति असे स्वागत झाल्यामुळे ती भारावली होती. शनिवारी 11 वाजता नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर तिची स्वागतयात्रा तब्बल 13 तास चालली. विनेशची यात्रा 125 किमीचा प्रवास करून आपल्या चरखी दादरी जिह्यात असलेल्या बलाली गावी पोहोचली. विनेशचा निघालेला रोड शो आपल्या देशातील आजवरचा सर्वात मोठा रोड शो असावा. या मार्गात तिचा तब्बल 100 पेक्षा अधिक ठिकाणी जाहीर सत्कारही करण्यात आला.

स्वागत स्वीकारून थकली विनेश

तब्बल 13 तास विनेशचा रोड शो रंगला. शेकडो ठिकाणी हजारोच्या गर्दीने तिचे जोरदार स्वागत केले. लोकांचे प्रेम स्वीकारत स्वीकारत गावी पोहोचलेल्या विनेशचा गावातील ऑलिम्पिक स्टेडियममध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. पण यादरम्यान स्वागत स्वीकारून दमलेल्या थकलेल्या विनेशची प्रकृती ढासळली. मग तिने खुर्चीवरच बसून आपल्या लोकांशी संवाद साधला. मात्र तिने अस्वस्थ वाटत असल्यामुळे रविवारी सकाळीही पत्रकारांशी संवादही साधला नाही.

लोकांच्या प्रेमाने मी भारावलीय

वजनवाढीमुळे पदक हुकल्यामुळे निराश झालेल्या विनेश फोगाटने कुस्तीलाही रामराम ठोकला, पण आज ती लोकांच्या आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने अक्षरशः भारावली होती. ऑलिम्पिक पदक न मिळाल्यामुळे मला खूप मोठी जखम झालीय. या जखमेतून सावरण्यासाठी मला काही काळ लागेल. पण लोकांकडून मिळालेल्या प्रेमाने ही जखम भरण्याचे बळ मला मिळालेय. हे बळ मला स्फूर्ती देईल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, माझा जन्म या गावात झालाय. आज मी माझ्या गावाचे कर्ज फेडण्यात काहीशी यशस्वी ठरलीय. माझ्या या गावातून आणखी एका माझ्या बहिणीचा जन्म व्हावा आणि तिने माझे सर्व विक्रम मोडावेत, अशी माझी मनापासून इच्छा असल्याचेही विनेश म्हणाली.