नवीन महाबळेश्वर प्रकल्पातून मुख्यमंत्र्यांसह बडय़ा सरकारी अधिकाऱ्यांची गावे वगळली

सातारा जिह्यात नवीन महाबळेश्वर गिरीस्थान विकसित करण्याच्या प्रकल्पातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे इनाम गाव तसेच सातारा जावळी, महाबळेश्वर व पाटणमधील काही गावे नगरविकास विभागाने तडकाफडकी वगळली आहेत. या गावांमध्ये लोकप्रतिनिधी  व त्यांच्या नातेवाईकांनी जमिनी विकत घेतल्या आहेत. या गावांचा इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश होता. परिणामी  व्यावसायिक बांधकामे करता आली नसती. त्यामुळे धनिकांची गावे नवीन महाबळेश्वर प्रकल्पातून वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.

पर्यावरणदृष्टय़ा हा परिसर संवदेशनशील असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प रद्द करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पात 55 गावांचा समावेश होता. पण नवे सरकार आल्यावर पुन्हा प्रकल्पाला गती देण्यात आली. यामध्ये 235गावांचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची  विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीही करण्यात आली.

ही गावे वगळली

या प्रकल्पात पूर्वी साताऱ्यातील बोपोशी, खिलारमुरा, जावळीतील गाढवली, गावदेव, महाबळेश्वरमधील पर्वत, दरे इनाम या गावांचा समावेश होता. पण मुख्यमंत्र्याच्या नगरविकास विभागाने शुद्धिपत्रक जारी करून ही गावे नवीन महाबळेश्वर प्रकल्पातून वगळली आहेत.

इकोसेन्सेटिव्ह गावांचा अडसर

या गावांचा इकोसेन्सेटिव्ह गावामध्ये समावेश झाला असता तर नव्या बांधकामांवर मर्यादा आल्या असत्या. त्यामुळे नवीन महाबळेश्वर प्रकल्पातून धनिकांची गावे वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.

गावे वगळणे संशयास्पद

महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दरे इनाम या गावाचा नवीन महाबळेश्वरमध्ये समावेश झाला आणि आता परत हे गाव का वगळले याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते  सुशांत मोरे म्हणाले.