भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांना मांजरी गावातून ग्रामस्थांनी पिटाळून लावले; मागील पाच वर्षातील विकास कामांचा जाब विचारला

bjp logo flag

मुखेड तालुक्यातील मांजरी गावाचा विकास केला नाही. ना रस्ता, ना पाणी अशी अवस्था असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांना गावातून पिटाळून लावले. यावेळी शेकडो गावकऱ्यांनी आमदारास गराडा घालत जाब विचारत आमदार डॉ. तुषार राठोड यांना विरोध केला.

मागील पाच वर्षात काय विकास कामे केली? गावात कुठलाच विकास केला नाही. मागील पाच वर्षात गावात कधी आले नाही, असे म्हणत राठोड यांच्या प्रचार सभेत गावकऱ्यांनी गोंधळ घालत सभा उधळून लावली. मुखेड तालुक्यातील मांजरी गावातील हा प्रकार आहे. भाजपाचे उमेदवार आमदार तुषार राठोड यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. मुखेड मतदारसंघात राठोड हे गावभेटी आणि प्रचार सभा घेत आहेत. याच प्रचारसभेदरम्यान मांजरी गावात गावकऱ्यांनी राठोड यांना मागील पाच वर्षात काय विकास कामे केली, असा सवाल करत त्यांची प्रचार सभा उधळून लावली.

मुखेड तालुक्यातील मांजरी येथे शुक्रवारी रात्री आमदार तुषार राठोड यांची गावभेट होती. यावेळी एका शेतकऱ्याने ‘माझ्या घराकडे पाणीपुरवठा होत नाही, असे सांगत ‘पाच वर्षात काय विकास केला’, असा प्रश्न विचारताच त्यावेळी इतर गावकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करताच आमदार राठोड यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला. 25 ऑक्टोबर रोजी मांजरी येथील मोकळ्या जागेवर आमदार राठोड यांची सभा पार पडली. त्यात हा सर्व प्रकार घडला.