विक्रोळी कन्नमवार नगर येथे बेस्टच्या धावत्या बसने पेट घेतला. चालकाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने वाहकाच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बसबाहेर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या डागा कंपनीच्या बसला आज सकाळी 11.50 वाजता कन्नमवार नगर पोलीस ठाण्याजवळ येताच पेट घेतला. बसचालकाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने वाहकाच्या मदतीने प्रवाशांना बसखाली उतरवले आणि बसमधील अग्निसुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
2023 मधील बस पेटल्याच्या घटना
1) नागपाडा येथे 9 डिसेंबरमध्ये धावत्या बसने पेट घेतला. यात सुमारे 15 ते 20 प्रवासी थोडक्यात बचावले.
2) मालवणी बस डेपोत उभ्या असलेल्या बेस्टच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसने 16 जूनला पेट घेतला.
3) अंधेरी पूर्व येथील आगरकर चौक येथे मातेश्वरी कंपनीच्या बसने 6 मार्चला पेट घेतला. या दुर्घटनेत प्रवासी थोडक्यात बचावले.
4) सांताक्रुझ बस आगारातील बस वांद्रे जंक्शन येथे भाडेतत्त्वावरील सीएनजी बसने 25 जानेवारीला पेट घेतला. यात 25 प्रवासी थोडक्यात बचावले.
5) कांदिवली लोखंडवाला सर्कलजवळ भाडेतत्त्वावरील बसला 27 ऑक्टोबरला आग लागली.