विक्रमगड शासकीय तंत्रनिकेतनमधील भावी अभियंत्यांचे भवितव्य अंधारात; 444 विद्यार्थ्यांसाठी फक्त 10 प्राध्यापक

विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (आयटीआय) शिक्षण घेणाऱ्या 444 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असली तरी त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचा भार फक्त 10 प्राध्यापकांवर आला आहे. त्यामुळे या तंत्रनिकेतनमध्ये अनेक विषयांच्या तासिका होत नाहीत. तंत्रनिकेतनमध्ये तासिका पद्धतीने काम करणाऱ्या 23 प्राध्यापकांना एप्रिल महिन्यात कमी करण्यात आले आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांचे एकही लेक्चर वेळेवर होत नाही.

विक्रमगड (झडपोली) येथे ४४४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फक्त १० प्राध्यापक आहेत, तर तात्पुरत्या स्वरूपातील तासिका पद्धतीने शिकवणाऱ्या २३ प्राध्यापकांना एप्रिल २०२४ पासून काढून टाकण्यात आले आहे. विशेष मानधनदेखील अदा करण्यात आले नाही. तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रामुख्याने कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाते, परंतु येथील प्रयोगशाळा व वर्कशॉपमध्ये कमीत कमी प्राध्यापक असल्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पालक धास्तावले असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.

या तंत्रनिकेतन विद्यालयात सिव्हिल इंजिनीयर, मेकॅनिकल इंजिनीयर, इलेक्ट्रिक इंजिनीयर व कॉम्प्युटर इंजिनीयर असे चार कोर्स चालतात. सिव्हिल इंजिनीयरच्या प्रथम वर्षाला १३, द्वितीय वर्षाला २७, तृतीय वर्षाला २८ असे एकूण ६८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मेकॅनिकल इंजिनीयरिंगच्या प्रथम वर्षाला २३, द्वितीय वर्षाला २७, तृतीय वर्षाला २० असे ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इलेक्ट्रिक इंजिनीयरिंगच्या प्रथम वर्षाला ४१, द्वितीय वर्षाला ३७, तृतीय वर्षाला ४१ असे एकूण ११९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कॉम्प्युटर इंजिनीयरिंगच्या प्रथम वर्षाला ६३, द्वितीय वर्षाला ६४, तृतीय वर्षाला ६० असे १८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.