नगरमध्ये भाजप नेत्यांमध्ये जुंपली, विखेंच्या गुंडांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

शिर्डीमध्ये भाजप नेत्यांमध्येच जुंपली आहे. विखेंच्या गुंडांनी आपल्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज डॉ. राजेंद्र पिपाडा रुई या गावात वेगवेगळ्या मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी गेले होतो. या वेळी रुई गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असताना पिपाडा यांना काही लोक भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्याठिकाणी विखेंचे गुंड पिपाडा यांच्यावर धावून गेले. त्यांनी पिपाडा यांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही विखेंचे लोक असुन आमच्या गावात तुम्ही यायचे नाही याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. वरील सर्व प्रकार पहाण्यासाठी त्याठिकाणी गावक-यांची मोठी गर्दी जमली होती त्यांनी मध्यस्थी करुन त्यांना बाजुला केले. उपस्थित लोकांना घडलेला प्रकार अजिबात आवडला नाही.

पिपाडा म्हणाले की, विखेंच्या हुकुमशाही व गुंडशाहीला आम्ही कधी घाबरलो नाही व घाबरणारही नाही. आमच्याशिवाय मतदारसंघात दुसरे कोणीच फिरु नये लोकांना भेटु नये,लोकांच्या समस्या सोडवु नये अशी विखेंची भूमिका आहे असा आरोप पिपाडा यांनी केला आहे.

9 सप्टेंबर रोजी विखें पितापुत्र खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत, त्यांच्या लोणी जवळील चंद्रपुर या गावात आमच्यावर त्यांच्या गुंडांमार्फत हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही कळवल्याचे पिपाडा यांनी सांगितले. याबाबत आम्ही रीतसर जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पत्राद्वारे कळविले होते. हे सर्व प्रकार विखे पितापुत्रच करत असतात असा आरोप पिपाडा यांनी केला आहे.