राज्यातील अनेक रुग्णांना जीवदान देणाऱया 108 रुग्णसेवेच्या कंत्राटात तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. . एका मंत्र्याच्या पुढाकाराने साडेतीन हजार रुपयांचे कंत्राट आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. जुन्या कंत्राटदाराला बाजूला करून सर्व नियम बदलले आणि नव्या कंत्राटदारावर मेहेरनजर केल्याचे पुढे आले आहे. त्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला फटाकरले आहे. तसेच या घोटाळ्याचे टेंडर रद्द करावे व दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
”साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका अँम्ब्युलन्सची किंमत 50 लाखाच्या आसपास असते. 1,529 अँम्ब्युलन्सचे प्रति अँम्ब्युलन्स 50 लाख या प्रमाणे एकूण 764 कोटी 50 लाख रूपये होतात. 800 कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी 8 हजार कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्यातील जनतेला माहित आहे. अॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे. सनदी अधिकाऱ्यांना ‘बदली’ची भीती दाखवून साडेतीन-चार हजार कोटींचे टेंडर 8 हजार कोटीपर्यंत फुगवल्याचे उघड झाले आहे. महायुती सरकारमधील अँम्ब्युलन्स घोटाळा आता उघड झाला असून अँम्ब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारने रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी ही आमची मागणी आहे, असे ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.