लोकसभेत मतांची झाली कडकी, म्हणून आठवली बहीण लाडकी; विजय वडेट्टीवार यांनी घेतला महायुतीचा समाचार

लोकसभेत मतांची कडकी आली म्हणून महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली आहे. आता तुम्हाला दीड हजार देतील मात्र तीन हजारने खिसा कापतील. त्यामुळे भगिनींनो सतर्क रहा, असे आवाहन करत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मराठवाडा विभागातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रत्येकाला आपल्या न्यायाचे हक्काचे आरक्षण मिळणार आहे. लोकसभेत आपले जोमाने लढत आहेत. त्यामुळे 56 इंच छाती म्हणणाऱ्यांची छाती आता 36 इंच झाली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सत्तेत बसवले आहे. 70 हजार कोटी खाल्ले आणि सरदार विचारतात बेटा कितना खाया? असा टोलाही वडेट्टीवार यांनी हाणला.

या सरकारला घालवण्यासाठी ताकदीने एकत्र या असे आवाहन करत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार. संविधान वाचवण्यासाठी लढाई लढली आता महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचविण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?गु जरातला गहाण नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.सध्या मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

यावेळी लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालना येथील खासदार डॉ. कल्याण काळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, दिलीपराव देशमुख,  आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज देशमुख, मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधीकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.