राज्यातील तलाठी भरती घोटाळय़ाची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱया परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली. तलाठी पद भरती रद्द करण्यासाठी परीक्षार्थींच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. घोटाळेबाजांवर कारवाई करण्याऐवजी सरकार आंदोलन चिरडण्यासाठी विद्यार्थ्यांवर कारवाई करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टीसीएसचेच कर्मचारी सहभागी आहेत. त्यांच्यावरदेखील गुन्हे दाखल आहेत. यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते, असे वडेट्टीवार म्हणाले.