पोलीस भरती पारदर्शक व्हावी ; दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे, विजय वडेट्टीवार यांची मागणी

महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यभरात बुधवारपासून पोलीस भरती सुरू होणार आहे. 17 हजार जागांसाठी 17 लाखहून अधिक अर्ज आले आहेत. ही पोलीस भरती अनेक वर्षांनी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या प्रचंड आहे. मात्र एका उमेदवाराला पाच ठिकाणी अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने उमेदवार कसे उपस्थित राहतील, याचे सरकारला भान असले पाहिजे .काही ठिकाणी उन्हाचा तडाखा आहे तर काही ठिकाणी पाऊस आहे. याचा फटका पोलीस भरतीतील उमेदवारांना बसू नये. याची खबरदारी सरकारने घ्यावी. भरती प्रक्रीया होणाऱ्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात. वैद्यकिय सुविधा, ऊन पावसापासून बचाव करणे अशा बाबींची सरकारने काळजी घ्यावी. दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, दरवर्षी नीट परीक्षेला देशभारातून 25 लाख विद्यार्थी बसतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करत असतात. यावेळी पहिल्यांदा देशातील 67 विद्यार्थी 720 पैकी 720 गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गुजरातच्या गोध्रा शहरातील जय जलाराम स्कूल या शाळेमधील ‘नीट’ परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी तर तब्बल 10 लाख रुपयांची बोली लागली होती. गुजरातप्रमाणे हरियाणा आणि बिहार मधील घोटाळ्यामध्ये पोलीसांनी कारवाई केली आहे.त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाई करण्यात यावी. केंद्र सरकारने या बाबतीत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी. यातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी त्यांनी केली. नीट परीक्षा ही खासगी क्लासेस चालवणारे आणि वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या हातात गेली आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रात चंद्रपूर, नांदेड मध्ये नीट विरोधात आंदोलने होत आहेत त्याची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत याविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा होता तसाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने लेखी आश्वासन द्यावे अशी लक्ष्मण हाके यांची मागणी आहे. याबाबत सरकारने सकारात्मक भूमीका घ्यावी.महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. मराठवाड्यात सरकारी धोरणांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा विकोपाला गेला. दुहीचे राजकारण करणाऱ्या सरकारने यावर तोडगा काढावा. दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या मागणीप्रमाणे सरकारने जातनिहाय जनगणना करावी, ही आमची मागणी आहे.पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.आजतागायत खरीप आढावा बैठक न घेतल्यामुळे वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून हे त्रिकुट सरकार संपत्ती आणि सत्त्तेसाठी एकत्र आले आहेत सेवेसाठी नाही असा टोला लगावला.