मुद्दा – दहावी-बारावी तर झाली, पुढे काय?

>> विजय पांढरीपांडे

दहावी-बारावीनंतर सर्वात मोठे प्रश्नचिन्ह असते, पुढे काय? यात विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चिंता पालकांना असते. कारण ते एका अर्थाने पालक नव्हे, तर मालक असतात. आपली स्वप्ने, इच्छा मुलावर थोपवतात. कोणते कोर्सेस चांगले, त्यात नेमके कोणते शिक्षण कसे दिले जाते, त्या शिक्षणाचा आपल्या मुलामुलीला भविष्यात काय फायदा होऊ शकतो? असे प्रश्न सुजाण, सुशिक्षित पालकांनादेखील पडत नाहीत. अगदी ‘कला’, ‘विज्ञान’, ‘तंत्रज्ञान’, ‘व्यवस्थापन’, ‘प्रौद्योगिकी’ या शब्दांचे नेमके अर्थदेखील सुशिक्षित पालकांना माहीत नसतात. वारे ज्या दिशेने वाहते त्या दिशेने गर्दी जाते. इथे रॉबर्ट फ्रॉस्टची सुंदर कविता आठवते. तो चौरस्त्यावर उभा आहे. सगळे लोक एका विशिष्ट मार्गाने जाताहेत. कवी तिकडे न जाता वेगळी अनोळखी पाऊलवाट निवडतो अन् त्याला वेगळे सुंदर विश्व बघायला मिळते. हा फरक आहे. आपण आपली स्वतःची वेगळी वाट शोधायची आहे. गर्दीच्या मागे जाऊन उपयोग नाही.

माझा सर्व दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सोपा सल्ला आहे. हा प्रयोग आजच करा. एक मोठा कोरा कागद घ्या. त्यावर मला काय आवडते, मला भविष्यात काय करायला आवडेल, माझी क्षमता कशात आहे, मला काय आवडत नाही, म्हणजे कठीण वाटते, घरची परिस्थिती कशाला पोषक आहे, अडचणी कुठे येऊ शकतात या अन् अशा प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तरे लिहा. केवळ एकाच पानावर, जास्त लांबण नको.

हे लेखन एकटाकी होणार नाही. ते तुम्हाला अनेकदा लिहावे, सुधारावे लागेल. त्याचा पंटाळा करू नका. त्यासाठी आईवडील, मित्रमैत्रिणी, शिक्षक अशा कुणाशीही तुम्ही चर्चा करू शकता, पण ते जे सांगतील त्याने प्रभावित, मोहित न होता तुम्हाला आतून प्रामाणिकपणे काय वाटते तेच लिहा.

या एक पेज लेखनाला ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ असे म्हणतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे तुम्हाला कामी येईल. म्हणजे कोर्स निवडताना, करीअर निवडताना, पार्टनर निवडताना, नोकरी शोधताना. अशा प्रत्येक वेळी स्वतःला काय हवे, काय करायचे आहे, आवड निवड कशात आहे, क्षमता कितपत आहे हा सेल्फ असेसमेंटचा प्रयोग महत्त्वाचा ठरतो. एक लक्षात ठेवा, हे लेखन तुम्हाला सात-आठ वेळा तरी करावे लागेल, सुधारावे लागेल.

आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे अभ्यासासाठी, नोकरी -व्यवसायासाठी असंख्य क्षेत्रे, संधी उपलब्ध आहेत. कुठेही तुमचे गुण, ग्रेड्स यापेक्षा तुमचे स्किल्स, तुमची आकलन क्षमता, तुमचे लेखन-संभाषण काwशल्य, भाषेवरील प्रभुत्व हे गुण जास्त महत्त्वाचे असतात. त्यासाठी प्रचंड अवांतर वाचन हवे. तुमची पंचेंद्रिये सदा जागरूक हवीत. अवतीभवती काही घडते आहे, जग कुठल्या दिशेने चालले आहे, समाजाच्या लोकल, ग्लोबल गरजा नेमक्या कोणत्या, समस्या कोणत्या, त्या सोडवण्यात मी कुठे कसे किती योगदान देऊ शकेन याचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे.

प्रत्येक विषय, प्रत्येक कोर्स आपापल्या परीने चांगला असतो. त्यात करीअरची संधी असते. खरे तर तुम्ही घेतलेले पदवी शिक्षण अन् पुढचे करीअर, व्यवसाय यात अर्थाअर्थी संबंध नसतो. नव्वद टक्के तरुण-तरुणी आपण जे शिकलो त्याचा पुढे नोकरी-व्यवसायात उपयोग करीत नाहीत. तिथे सगळे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असते. म्हणजे सगळे तुम्हाला नव्याने शिकावे लागते. कधी कधी आपण जे शिकलो ते विसरावेसुद्धा लागते. नवनवीन शिकायला तुम्हाला सदा तत्पर राहावे लागेल. आजच्या काळात ‘मला अमुक येत नाही’ हे वाक्य उद्या कुणीही ऐकून घेणार नाही. शिक्षणाचे, नोकरी-व्यवसाय- उद्योगाचे आजचे स्वरूप अन् दहा वर्षांनंतरचे स्वरूप यात जमीन अस्मानाचा बदल झालेला असेल. त्यामुळे या सातत्याने होणाऱया बदलासाठी तुम्हाला सदा तत्पर राहावे लागेल.

अमुक विषय, अमुक कोर्स, अमुक कॉलेज चांगले, दुसरे वाईट असे काहीही नसते. प्लस-मायनस सगळीकडेच असते हेही लक्षात घ्या. आयआयटीत सारे काही आलबेल आहे हा समज चुकीचा. त्यामुळे कोर्स, कॉलेजची निवड स्वतःची बुद्धी, आर्थिक परिस्थिती, शारीरिक-मानसिक परिस्थिती हे सारे विचारात घेऊनच करावी. जे मिळाले त्यात निराश न होता समाधान मानावे.

एक मात्र खरे, जो कोर्स निवडला, जो विषय घेतला त्याचा मन लावून अभ्यास करा. परीक्षेत किती गुण मिळतात हे महत्त्वाचे नाही. तुम्हाला काय येते, तुम्ही दुसऱयासाठी काय करू शकता, तुमची क्षमता किती, तुमचा उपयोग कुणाला किती यावरच तुमच्या करीअरचे भवितव्य अवलंबून असते. पह्कस, एकाग्रता हे महत्त्वाचे. परिश्रमाला पर्याय नाही. लोक चांगल्या माणसाची अजूनही कदर करतात.
आपल्याला किती पर्सेंटेज मिळाले, प्रवेश परीक्षेत काय रँक आली याची फारशी चिकित्सा करण्यात अन् निराश होण्यात अर्थ नसतो. झाले गेले विसरून विद्यार्थ्यांनी पुढचा विचार करावा. भविष्यात संधीच संधी आहेत, अनेक पर्याय आहेत. निराश होण्याचे काहीही कारण नाही. ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ मात्र लिहायला विसरू नका.