Lok Sabha Election 2024 : विधान भवनात अध्यक्षांच्या दालनात भरवला जनता दरबार; राहुल नार्वेकर यांच्याकडून आचारसंहिता भंग

विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दक्षिण मुंबईतील दक्ष नागरिकांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱयांकडे दाखल केली आहे. आचारसंहिता असतानाही नार्वेकर हे त्यांच्या दालनामध्ये शासकीय अधिकाऱयांना बोलावून नागरी कामे करण्याचे आदेश देत असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्यानंतर देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र राहुल नार्वेकर यांच्याकडून आचारसंहितेची खुलेआम पायमल्ली केली जात आहे. नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष या सांविधानिक पदाचा गैरवापर करून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध नागरी प्रश्नांबाबत स्वतःच्या दालनात महानगरपालिका व शासकीय अधिकाऱयांना बोलावून वारंवार बैठका घेत आहेत आणि त्यांना नागरी कामे तातडीने करण्यासंदर्भात आदेश देतात. इतकेच नव्हे तर नार्वेकरांच्या दालनात अधिकाऱयांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवला जात असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱयांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

विधान भवनातील सीसीटीव्ही फुटेज तपासा

तक्रारदारांनी या तक्रारींमध्ये राहुल नार्वेकर यांचे एक उदाहरणही दिले आहे. नार्वेकर यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या व नागरी प्रश्नांसंदर्भात 2 एप्रिल रोजी विधिमंडळातील अध्यक्षांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये म्हाडा, महानगरपालिका आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. नार्वेकरांकडून आचारसंहितेचा भंग होतोय याची खात्री करण्यासाठी विधान भवनाच्या सुरक्षा विभागाची प्रवेशद्वारावरील अभ्यागतांची यादी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत आणि ते पुरावे नष्ट होण्यापूर्वीच जप्त करावेत, अशी विनंतीही तक्रारदारांनी केली आहे. नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.