मतांची वजाबाकी टाळण्यासाठी मिंधे, अजितदादांची धडपड; आज विधान परिषद निवडणूक, उत्कंठा शिगेला

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीला 12 उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाची छाप निश्चितच या निवडणुकीतही पडणार याची जाणीव महायुतीला झाली आहे. आपले सर्व आमदार एकत्रित ठेवण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षासह महायुतीसमोर आहे, तर दुसरीकडे मिंधे गट आणि अजित पवार गटाची आपल्या मतांची वजाबाकी टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी हॉटेल पॉलिटिक्सचा आधार घेतला आहे. तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून चुरस वाढवणाऱया महाविकास आघाडीला मात्र आपले तीनही उमेदवार निवडून येतील अशी खात्री आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा वाढला आहे तर महायुतीची टिकून राहण्यासाठी धडपड सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. 11 जागा आणि 12 उमेदवार असल्याने एकाची विकेट पडणारच आहे, पण ती नेमकी कुणाची असणार यावरून चर्चा सुरू आहे. विशेषकरून मिंधे गट आणि अजित पवार गटातील आमदारांमध्ये चुळबुळ सुरू आहे.

लोकसभा निवडणूक ही नेत्यांच्या नव्हे तर जनतेच्या हातात होती. तशीच विधान परिषदेची निवडणूकही नेत्यांऐवजी आमदारांच्या हातात गेली आहे. या निवडणुकीत आमदार मतदान करतात. साधारणपणे नेत्यांच्या आदेशानुसार मतदान होते. पण आता परिस्थितीच बदलली आहे. उद्याच्या निवडणुकीत मतदान करणारे आमदार विधानसभेच्या निवडणुकीचे गणित करूनच मते देतील असा अंदाज आहे.

उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे, पण चुरस वाढल्याने मतेही फुटण्याची भीती आहे. विशेषकरून मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांची मते फुटतील अशी चर्चा आहे. तशी भीती भाजपलाही वाटतेय म्हणूनच महायुतीमधील या तीनही भागीदारांनी आपापले आमदार एकत्रित ठेवण्यासाठी त्यांना पंचतारांकित हॉटेलांमध्ये ठेवले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर बारीक पहाराही ठेवला असल्याचे समजते. पण गुप्त मतदान असल्याने त्याला फारसा फायदा होईल अशी शक्यता कमी आहे. या स्थितीत अपक्षांचाही भाव वधारला आहे.

उद्याची निवडणूक पाहिल्यास त्यात भाजपला त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे. अजित पवार गटाच्या शिवाजीराव गर्जे यांना सहा मते हवी आहेत. मिंधे गटालाही काही मतांची आवश्यकता आहे.

– विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. काही आमदारांचे निधन आणि राजीनामे यामुळे त्यातील 14 जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या 274 आमदार आहेत.

– महायुतीकडे 180 आमदार आहेत. त्यात भाजप 103, मिंधे गट 37, अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. महायुतीला 13 अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यात बहुजन विकास आघाडी, रासप, प्रहार जनशक्ती, स्वाभिमानी शेतकरी आणि जनसुराज्य पार्टी या पक्षांच्या 9 सदस्यांचा समावेश आहे. म्हणजेच महायुतीकडे 202 आमदार आहेत.

– महाविकास आघाडीकडे 64 आमदार आहेत. त्यात शिवसेना 15, काँग्रेस 37, राष्ट्रवादी काँग्रेस 12 असे बलाबल आहे. आघाडीला समाजवादी पार्टीच्या 2, एमआयएम 2, शेकाप 1, सीपीआय 1, क्रांतिकारी शेतकरी आघाडी 1 अशा 7 आमदारांचा पाठिंबा आहे. म्हणजेच महाविकास आघाडीकडे 71 आमदारांचे बळ आहे.

– महायुतीकडे कागदावर 202 आमदारांचा पाठिंबा आहे. एका उमेदवाराला 25 मतांचा कोटा दिला तरी महायुतीचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतात. परंतु नववा मतदार निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची फक्त 2 मते असतील. याचमुळे महायुतीसमोर सर्वच आमदार एकत्र ठेवण्याचे आव्हान आहे.

2022 सारखे डावपेच खेळणे कठीण
2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी डावपेच खेळून इतर पक्षांचे आमदार पह्डले होते. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. मराठा आरक्षण, सरकारबद्दल ओबीसींमधील असंतोष, महाविकास आघाडीच्या पाठीशी असलेली दलित आणि मुस्लिम मते यामुळे अनेक आमदारांच्या मतदारसंघांतील गणिते बदलली आहेत. त्यामुळे आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या सोयीच्या पक्षाला मतदान करून त्यांचे विधानसभेचे तिकीट नक्की करू शकतात आणि त्यामुळे क्रॉस व्होटिंगची शक्यता अधिक आहे, अशी जोरदार चर्चा आहे. फडणवीसांना यावेळी इतरांची मते पह्डण्यापेक्षा ही क्रॉस व्होटिंग रोखण्याचे आव्हान आहे. त्यात ते यशस्वी होतील अशीही शक्यता कमी झाली आहे. कारण 2022 मध्ये फडणवीसांकडे येणाऱ्यांची संख्या अधिक होती. आता लोकसभेनंतर त्यांना सोडून जाणाऱ्यांची संख्या अधिक असू शकते. त्यामुळे कुटील डाव खेळून उद्याची निवडणूक कुणालाही जिंकता येणार नाही अशीच एकंदरीत परिस्थिती आहे.

हे उमेदवार रिंगणात
महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर (शिवसेना), प्रज्ञा सातव (काँग्रेस), जयंत पाटील (शेकाप) तर महायुतीकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत (भाजप), भावना गवळी आणि कृपाल तुमाने (मिंधे गट), राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे (अजित पवार गट) हे उमेदवार रिंगणात आहेत.

विधान परिषद निवडणुकीला काँग्रेस आमदारांना व्हीप जारी
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधानसभेतील आपल्या सर्व आमदारांना आज व्हीप जारी केला. पक्षाच्या आदेशाप्रमाणे सर्व आमदारांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानात सहभागी होणे अनिवार्य असून पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

गणित काय सांगते?
जिंकण्यासाठी मतांचा एकूण कोटा 23 इतका आहे. महाविकास आघाडीकडे कागदावर 71 आमदारांचा पाठिंबा आहे. एका उमेदवाराला 25चा कोटा दिला तर पहिल्याच फेरीत तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला फक्त 2 ते 3 अधिकच्या मतांची गरज आहे. महायुतीचे किंवा त्यांना पाठिंबा देणाऱया पक्षांचे दोन ते तीन आमदार फुटले तरी महाविकास आघाडी पहिल्याच फेरीत बाजी मारू शकते.