अल्पवयीन मुलांना मारहाण करून काढली धिंड, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; नगरमधील नवनागापुरातील घटनेने खळबळ

अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना एमआयडीसीमधील नवनागापूर परिसरात घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलांच्या जबाबावरून 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुसऱ्या फिर्यादीत चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहाण करताना केलेले व्हिडीओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

राहुल पाटील, प्रशांत वंजारे, करण काळे, प्रवीण गिते, विशाल काटे, विशाल कापरे, हर्षल गायकवाड, सोनू शेख, आर्यन शेवाळे, सागर दारकुंडे, सुरज शिंदे, रोहित (पूर्ण नाव नाही), पप्पू पगारे (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाणेहद्दीत राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरुण सोमवारी (दि. 24) दुपारी गेले होते. त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून त्यांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून धमकी दिली. मारहाणीत मुलांच्या हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले असता, तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या घटनेची दखल घेतली नाही. जखमींची फिर्याद नोंदवून घेतली नाही. त्यांना रुग्णालयात जाण्यास सांगितले. जखमी जिल्हा रुग्णालयात गेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहाण झालेले मुलांचे नातेवाईक राहुल मारुतीराव पाटील (वय 29, रा. शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी सायंकाळी चार अल्पवयीन मुलांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, दमदाटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मला मारण्यासाठी कोणी सुपारी दिली’, असे विचारले असता, चौघांनी लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ दुसऱ्या दिवशी (दि. 25) सोशल मीडियावर व्हायरल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना याची माहिती मिळाली व अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली व घडलेला प्रकार सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या जबाबावरून 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

झाडाला बांधून मारहाण

चोर असल्याचे समजून एकाला झाडाला बांधून बेदम मारहाण झाल्याची घटना सारसनगर औसरकर मळा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पाचजणांना ताब्यात घेतले असून, मारहाण करणाऱ्यांविरोधात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चोर समजून हात-पाय बांधून, झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मारहाण करून त्या व्यक्तीस सोलापूर रोडवर टाकून देण्यात आल्याची माहिती आहे.