टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील आपल्या पहिल्यावहिल्या विजयासाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या सामन्यात पदार्पणवीर युगांडाने पापुआ न्यू गिनीचा 10 चेंडू आणि 3 विकेट राखून पराभव केला आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या विजयाचा झेंडा फडकावला.
गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेला हा कमी धावसंख्येचा सामना थरारक झाला नसला तरी जोरदार झाला. पापुआ न्यू गिनीला 77 धावांत गुंडाळून युगांडाने अर्धी लढाई जिंकली होती. पण अलेई नाओ, नॉर्मन वनुआ, चाद सोपर आणि असाद वालाने पीएनजीला एकामागोमाग पाच हादरे देत युगांडाची 5 बाद 26 अशी केविलवाणी अवस्था केली होती, पण रिआजत अली शाहने 56 चेंडूंत केवळ एक चौकार लावत केलेल्या 33 धावांच्या खेळीने युगांडाला ऐतिहासिक विजयाचा आनंद मिळवून दिला. त्याने जुमा मियागीबरोबर सहाव्या विकेटसाठी रचलेली 35 धावांची भागी निर्णायक ठरली. जुमाने 13 धावा केल्या. रिआजत विजयापासून 3 धावा दूर असताना बाद झाला.
पीएनजी 77 धावांवर आटोपला
पीएनजीचे फलंदाज युगांडाच्या गोलंदाजांचा सामनाही करू शकले नाही. सामन्याच्या दुसऱयाच चेंडूवर रामजानीने कर्णधार असाद वालाला भोपळाही पह्डू दिला नाही. त्यानंतर ठरावीक अंतराने युगांडाच्या गोलंदाजांनी पीएनजीचे फलंदाज बाद केले. अत्यंत संथ चाललेल्या या सामन्यात पीएनजीचे फलंदाज 20 व्या षटकांपर्यंत मैदानात उभे राहिले, पण त्यांच्या फलकावर केवळ 77 धावाच लागल्या होत्या. अल्पेश रामजानी, कॉसमॉस क्येवुता, जुमा मियागी आणि फ्रँक एनसुबुगा यांनी प्रत्येकी 2 विकेट मिळवले. एनसुबुगाने तर आपल्या चार षटकांच्या गोलंदाजीतील दोन षटके निर्धाव टाकत केवळ 4 धावांत 2 विकेट टिपले. तो वर्ल्ड कपमध्ये 20 चेंडू निर्धाव टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 2012 साली श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने ही किमया करून दाखवली होती.