ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, पुणे येथील घरात आढळला मृतदेह

मराठीतले देखणे अभिनेते अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते.  तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे ते गेले काही महिने भाडेतत्वावर राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडल्यानंतर घरात त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी, सून आणि नातू असा परिवार आहे.

मूळ बेळगाव येथे जन्मलेले रवींद्र महाजनी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी अभिनयातच कारकिर्द करण्याचं निश्चित केलं होतं. महाविद्यालयीन जीवनात त्यांची अनेक कलाकार आणि निर्मात्यांशी ओळख झाली. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली त्यातली मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, अशा अनेक यशस्वी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आणि चित्रपटही हिट झाले. ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ अशा गाजलेल्या चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या.

1990नंतर त्यांनी आपला रोख चरित्र भूमिकांकडे वळवला होता.‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. 2015 नंतर त्यांनी ‘काय राव तुम्ही’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’, ‘पानीपत’ अशा चित्रपटांमध्ये ते झळकले होते.