भाजपच्या उपजिल्हाध्यक्षासह तीन जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नालासोपारा येथील संतापजनक घटना

मिंधेंच्या सत्ताकाळात महिला सुरक्षित नसून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नालासोपाऱ्यात भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष संजू श्रीवास्तव याच्यासह तीन जणांनी एका पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून अत्याचारी भाजप संजू श्रीवास्तव पदाधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे.

2021 साली होळी सणाच्या दिवशी पीडित महिलेला संजू श्रीवास्तव याने कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने आचोळे येथील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्याठिकाणी शितपेयात गुंगीचे औषध टाकून संजू श्रीवास्तव आणि त्याचा साथीदार नवीन सिंगने महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. धक्कादायक बाब म्हणजे महिलेवर अत्याचार होत असताना आरोपी नवीन सिंग याची पत्नी हेमा सिंगने या घटनेचे चित्रीकरण केल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. या व्हिडीओच्या आधारे वेळोवेळी ब्लॅकमेल करत तिच्यावर त्यानंतरही नवीन सिंग सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी संजू श्रीवास्तव, नवीन सिंगविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी फरार

नवीन सिंग याची पत्नी हेमा सिंग हिने पीडितेला शहर सोडून जा नाहीतर जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. शिवीगाळ व दमदाटी करून आपली बदनामी केल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. संजू श्रीवास्तव हा भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष असून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामगार युनियन चालवत असल्याचे समोर आले आहे. तिन्ही आरोपी फरार आहेत.