वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचाच भाग, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची अधिकृतपणे युती झालेली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेऊन ही युती जाहीर केली. शिवसेना हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहे आणि आमच्याबरोबर वंचितची युती आहे. त्यामुळ वंचितही महाविकास आघाडीचाच घटक आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडीसोबत लोकसभेच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सता-सात वेळा चर्चा झाली असून ते सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र बसून चर्चा झाली असून त्यात काही निर्णयही झालेले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही. काहीही झाले तरी संविधानाचे रक्षण व्हायला पाहिजे, डॉ. आंबेडकरांच्या भूमिकांचे, विचारांचे रक्षण व्हायला पाहिजे हा ठाम विचार प्रकाश आंबेडकर यांचाही असून त्यांनी सभेत सातत्याने तो मांडलेला आहे.

आम्ही समविचारी पक्ष हे बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन पुढे जाणार आहोत. अकोल्याची जागा परंपरेने प्रकाश आंबेडकर लढतात आणि त्यांनीच ती लढावी याबाबत महाविकास आघाडीत एकमत आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. यासोबत कोणत्या जागेवर वंचितचे उमेदवार जाहीर करता येतील याच्यावरील चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आली आहे, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, दक्षिण मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद नाही. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत गेल्या दोन टर्मपासून या जागेचे प्रतिनिधित्व करतात. गेले 10 वर्ष शिवसेना ती जागा लढतेय आणि जिंकतेय. जसे भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचे आहे तसे काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे सगळे दिल्लीत एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. काँग्रेसच्या नेत्यांना एकेका जागेसाठी दिल्लीत जायला लागू नये म्हणून आम्ही त्यांची ही सोय पहात आहोत, असेही राऊत म्हणाले.