उत्तर प्रदेशमध्ये सात वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात एका सात वर्षाच्या मुलीचा खेळता खेळता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपेक्षा कुमारी असे त्या मुलीचे नाव आहे.

अपेक्षा ही सरुपूरच्या योगीनाथ विद्यापीठ पब्लिक शाळेत शिकत होती. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ती शाळेच्या मैदानात इतर विद्यार्थीनींसोबत खेळत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडली. त्यानंतर शाळेने तिला रुग्णालयात दाखल केले व तिच्या कुटुंबीयांना याबाबत कळवले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. डॉक्टरांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार अपेक्षाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समजते. अपेक्षाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नसून त्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टता येईल, असे पोलिसांचे म्हणने आहे.

सध्या पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. अपेक्षाचे वडील संदीप कुमार हे बिजनौर पोलीस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. अपेक्षाचे वडील व आईमध्ये वाद असल्यामुळे ते दोघे दोन वर्षांपासून वेगळे राहत होते.