कमला हॅरिस यांची ट्रम्प यांना टक्कर, अमेरिकेतील 60 राज्यांच्या नेत्यांनी दिला पाठिंबा

अमेरिकेत येत्या 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोव्रेटीक पक्षातर्फे कमला हॅरिस मैदानात आहेत. दोघांमध्ये जोरदार टक्कर दिसत आहे. अशातच 60 हून अधिक दक्षिण आशियाई अमेरिकन राज्य आणि स्थानिक निवडून आलेल्या नेत्यांनी कमला हॅरिस यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. ‘इंडियन इमिग्रंट आईची मुलगी म्हणून ती अधिक न्याय्य आणि अधिक सर्वसमावेशक इमिग्रेशन प्रणाली बनवेल,’ असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला. कमला हॅरिस यांच्या विजयाने सर्व महिलांना एक शक्तिशाली संकेत जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हिंदुस्थानी की कृष्णवर्णीय?

कृष्णवर्णीय पत्रकारांच्या अधिवेशनात बोलताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या वांशिक ओळखीबाबत प्रश्न उपस्थित केले. कमला हॅरिस या हिंदुस्थानी की कृष्णवर्णीय? असा सवाल त्यांनी केला. अमेरिकेच्या शिकागोमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॅक जर्नालिस्ट कन्व्हेन्शन’मध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘काही वर्षांपूर्वीपर्यंत मला हे माहीत नव्हतं की कमला हॅरिस कृष्णवर्णीय आहेत. आता त्या अचानक कृष्णवर्णीय बनल्या आहेत, असे ट्रम्प यावेळी  म्हणाले.