अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळविला आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्या विजयाने प्रचंड खुश आहे. मात्र ट्रम्प यांची एक नातेवाईक त्यांच्या या निकालाने अजिबात आनंदी झालेली नाही. शिवाय तिने तिची नाराजी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत शेअर केली आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय झाला आहे. या विजयाबरोबर ट्रम्प पुन्हा एकदा अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनणार असून 20 जानेवारी 2025 रोजी ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांच्या विजयाने संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. विजयानंतर जेव्हा ट्रम्प यांनी समर्थकांशी संबोधन केले. त्यावेळी स्टेजवर त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. दरम्यान, ट्रम्प यांची एक नातेवाईक त्यावेळी होती आणि ती त्यांच्या विजयाने बिलकुल आनंदी झाली नाही. ती म्हणजे त्यांची पुतणी.
ट्रम्प यांच्या विजयाने त्यांची पुतणी निराश झाली आहे. मेरी एल ट्रम्प असे तिचे नाव असून ती ट्रम्प यांचा मोठा भाऊ फ्रेड ट्रम्प यांची लहान मुलगी आहे. फ्रेड यांचे 42 व्या वर्षी निधन झाले होते. काका डोनाल्ड यांच्या विजयाने पुतणी मेरी निराश झाली आहे आणि सोशल मीडियावर तिने ही नाराजी व्यक्त केली आहे. तिने लिहीले की, मला मनापासून खेद वाटतो. “मी आमच्याबद्दल चांगला विचार केला होता.”
मेरी ही काका डोनाल्ड ट्रम्प यांची समर्थक नाही. सप्टेंबर 2020 मध्ये, मेरीने तिचे काका आणि तिच्या वडिलांच्या इतर भावंडांवर दावा दाखल केला की, त्यांनी मेरीला तिच्या आजोबांच्या मालमत्तेतून मिळालेल्या लाखो डॉलर्सची फसवणूक केली. तथापि, नोव्हेंबर 2022 मध्ये हे प्रकरण रद्द करण्यात आले. अशा परिस्थितीत काका-पुतणीचे अजिबात जमत नाहीत. मेरीने या निवडणुकीत कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला होता आणि लोकांना मतदान करण्याचे आवाहनही केले होते.