उरणमध्ये ईव्हीएमचा झोल; मतदानापेक्षा मोजणीत जास्तीची मते आली कुठून? फेरमोजणीसाठी मनोहर भोईर यांची मागणी

उरण विधानसभा मतदारसंघात 2 लाख 62 हजार 747 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र मतमोजणीच्या वेळी चक्क 2 लाख 63 हजार 548 मते असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे 801 वाढीव मते नेमकी आली कुठून, असा सवाल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला असून ईव्हीएमचा हा झोल उघड करण्यासाठी फेरमतमोजणी करा अशी मागणी केली आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे फेरतपासणी शुल्कापोटी 8 लाख 2 हजार 400 रुपये भरले आहेत.

विधानसभा निवडणुकीत खोके सरकारविरोधात लाट असताना निकाल मात्र उलटाच लागला. खुद्द भाजप, मिंध्यांनादेखील राक्षसी बहुमत मिळेल असे वाटले नव्हते. ईव्हीएमच्या कृपेनेच हे ‘मुमकीन’ झाल्याचा आरोप होत असताना उरणमध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. उरण विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 42 हजार 101 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 62 हजार 747 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतमोजणी झाल्यानंतर झालेले मतदान आणि मोजणीतील मतदान यामध्ये 801 मते वाढीव निघाल्याचे समोर आले आहे.

याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी ईव्हीएम सेट सी, व्ही अॅक्टिव्हीटी 27 बी यू, 17 सी यू आणि 17 व्हीव्हीपॅटनुसार फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. यासाठी 8 लाख 2 हजार 400 रुपयांचे शुल्क भरले आहेत.