सरकारी योजनेसाठी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला… अजित पवारांची सभागृहात कबुली

ajit pawar vidhan sabha

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका आणि महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे राज्य सरकारसाठी चिंतेची बाब ठरलं. आता सगळ्यांच्या नजरा विधानसभा निवडणुकांकडे लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांकडून काही ठिकाणी काही लोकांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी या गोष्टी समोर मांडत सरकारला लक्ष्य केलं. अखेर राज्य सरकारला त्यात कारवाई करावी लागली. आणि विधिमंडळात स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान विधानसभेच्या सभागृहात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. यावेळी बोलताना त्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्याची कबुली दिली आहे. त्याच बरोबर अशा लोकांनावर कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले की, ‘राज्यात महिला आणि मुली सक्षम झाल्या पाहिजेत हे लक्षात घेऊन आम्ही योजना आणली, त्याची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे ताजं उदाहरणा आहे. माता-भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगा लावल्या. मात्र काही ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या झाल्या काही ठिकाणी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली अजित पवार यांनी सभागृहात दिली. त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई केल्याचं देखील ते म्हणाले.

तसेच आज सभागृहात उत्तर देताना अजित पवार यांनी राज्यातील महिलांना विनंती केली की, ‘जे लाभार्थी यामध्ये बसताहेत आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुणालाही एक दमडीही देऊ नका. अजिबात देण्याचं कारण नाही. तसं कुणी करत असेल तर आमच्या लक्षात आणून द्या’, असं आवाहन देखील दिलं.