UP News : लग्नाच्या जेवणात मच्छी का ठेवली नाही? नवरदेवाने नवरीच्या कानशीलात लगावली

लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. त्यामुळे थाटामाटात लग्न करण्याला प्राधान्य दिले जाते. तसेच वऱ्हाडी मंडळींसाठी पंचपक्वानांची मेजवाणी सुद्धा ठेवली जाते. परंतु उत्तर प्रदेशातील एक विवाहसोहळा याच पंचपक्वानांमुळे चर्चेत आला आहे. जेवणामध्ये मच्छी ठेवली नाही, म्हणून वऱ्हाड्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, तर भर मांडवात नवऱ्याने चक्क नवरीच्याच कानशीलात लगावली.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बघौचघाटमधील विवाह सोहळा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. बिहारमधील गोपालगंजचा कमलेश (बदलेले नाव) याचा विवाह उत्तर प्रदेशातील देवरियामधील पायल (बदलेले नाव) हिच्या सोबत होणार होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. वाजत-गाजत कमलेशचे वऱ्हाड पायलच्या घरी पोहोचले. सर्व काही व्यवस्थित चालले होते. लग्न अंतिम टप्प्यात आले होते. कमलेश आणि पायल एकमेकांना हार घालणार, त्याचवेळी वऱ्हाड्यांनी कमलेशला जेवणामध्ये मच्छी नसल्याचे सांगितले आणि कमलेशचा पारा चढला.

साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांसाठी जेवणामध्ये मच्छी ठेवली होती. तर लग्नामध्ये मच्छी का नाही? असा सवाल त्याने पायलला केला. आमच्याकडे लग्नामध्ये शाकाहारी जेवण असल्याचे पायलने सांगताच, कमलेशने पायलच्या सलग दोन ते तीन कानाखाली मारल्या. त्यानंतर वऱ्हाड्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.