तरुणाचे अपहरण करत वडिलांकडे पैशांची मागणी; मग पोलीस तपासात जे समोर आलं त्याने सर्वच चक्रावले!

उत्तप्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे मेडिकल स्टोअरमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तरुणाचे हातपाय बांधलेला व्हिडिओ त्याच्या वडिलांना पाठवण्यात आला. अपहरणकर्त्यांनी तरुणाच्या सुटकेसाठी त्याच्या वडिलांकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

अलीगढमधील अकराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मेडिकल स्टोअरमध्ये औषधं आणण्यासाठी गेलेला एक तरूण पुन्हा घरी आलाच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर मेडिकल स्टोअरच्या परिसरात त्याची दुचाकी उभी असलेली आढळून आली. मात्र तरुणाचा काही तपास लागला नाही. काही वेळाने अपहरणकर्त्यांनी तरुणाचा हातपाय बांधालेला एक व्हिडिओ वडिलांच्या मोबाईलवर पाठवला. व्हिडिओ पाठवत वडिलांकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली. मात्र जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा तरुणानेच स्वत:च अपहरण केल्याचे उघड झाले. त्यानंतर अंकित नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. त्याला जुगारामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याने स्वत:च्या अपहरणाचा कट रचला होता.