Diwali 2024 – फटाके फोडण्याची स्पर्धा; 7 दुकानं जळाली, व्यापाऱ्यांचं कोट्यावधींच नुकसान

देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लगबग सुरू आहे. मात्र, या उत्साही वातावरणाला गालबोट लावणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. फटाके फोडण्याच्या स्पर्धेमुळे भयंकर दुर्घटना घडली आणि 7 दुकानं जळून खाक झाली आहेत. ऐन दिवाळीत व्यापाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.

सदर घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबेरू कोतवाली परिसरात दिवाळी निमित्त दुकानं बंद करून व्यापारी आपापल्या घरी गेले होते. याच दरम्यान काही हुल्लडबाजांनी फटाके फोडण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यामुळे दुकानाच्या मागच्या बाजूला आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारणं केले आणि 4 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. तर 3 दुकानांमधील काही सामान जळाले आहे. सर्व दुकानांचे मिळून जवळपास कोट्यावधींच नुकसान झालं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांवर ऐन दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे भविष्याच्या चिंतेने कुटुंबीयांनी टाहो फोडला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळाने आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अश्वासन दिले आहे.