अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान, बळीराजाची डोकेदुखी वाढली

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट घोंघावत असून गेल्या 72 तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन हिवाळ्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे बळीराजाची डोकेदुखी वाढली आहे. उभी पिके पुन्हा चिखलात गेल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांदा यांसारख्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून पुढच्या 72 तासांत राज्यात अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील 18 जिह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱयांची चिंता आणखी वाढली आहे.

धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर या जिह्यात तसेच मराठवाडय़ातील छत्रपती संभाजीनगर या जिह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

मुंबईवर धुरके कायम
मुंबईत पारा 2 अंश सेल्सियसने घसरला. सांताक्रुझ, बोरिवलीसह अनेक भागात 18अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पहाटे धुके आणि धुरके यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. उंच इमारतीही धुरक्यात हरवल्याचे चित्र होते. थंडीसोबत धुरकेही कायम असल्यामुळे मुंबईत प्रदूषण कायम असल्याचे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिसत आहे.