मंगळवेढय़ातील 18 गावांना अवकाळीचा फटका

मंगळवेढा तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा तालुक्यातील 18 गावांना फटका बसला. या पावसाने शेतीपिकांचे व घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना क्षेत्रीय कर्मचाऱयांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. बुधवार, गुरुवार, शुक्रवारी सलग आलेल्या पावसाने तालुक्यातील जवळपास 18 गावांमध्ये शेतीपिकांचे, घरांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱयाने 25 घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे संसार उघडय़ावर आला आहे. तसेच दोन ठिकाणी झाड घरावर पडून भिंतींचे नुकसान झाले आहे. तसेच वीज पडून कर्जाळ येथे एक व बोराळे येथे एक गाय, कचरेवाडी येथे एक म्हैस, आंधळगाव व रेवेवाडी येथे शेळी मृत्युमुखी पडली आहे. त्याचप्रमाणे तळसंगी, मरवडे, डिक्सळ येथे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील डिक्सळ, रेवेवाडी, भाळवणी, मरवडे, जालिहाळ, बावची, खडकी, कर्जाळ, कात्राळ, तळसंगी, कचरेवाडी, आंधळगाव, कागष्ट, लमाणतांडा, हाजापूर, बोराळे आदी गावांमध्ये नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. तसेच शुक्रवारी रात्री आलेल्या वादळी पावसाने माचणूर येथील सातजणांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाला तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी भेटी दिल्या असून, नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे.

हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात येणार असून, अजूनही ज्या शेतकऱयांच्या नुकसानीचा पंचनामा करायचा राहिला असेल त्यांनी तलाठी, सर्कल यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.