विखेंनीच माझ्या उमेदवारीला विरोध केला

माझ्या शांत स्वभावाचा फायदा सर्वजणच घेतात. जागा वाटपावरून मीही वाद घातला असता; पण तसे केले नाही. शिर्डीची जागा आरपीआय पक्षाला देऊ नये, रामदास आठवले हे प्रबळ उमेदवार नाहीत, असे पत्र राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते. त्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी विखे-पाटील यांच्यावर आरोप केला.

रामदास आठवले यांना शिर्डीच्या जागेवरून प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ‘निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे दाखले देत भाजपने मिंधे गटाच्या अनेक नेत्यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी द्यावी, याच्या सूचना भाजप नेतृत्वाने केल्या. ‘जिंकून येणाऱया उमेदवारालाच उमेदवारी’, असाच निकष ठेवण्यात आला. हेच लक्षात घेऊन, ‘शिर्डीसाठी रामदास आठवले प्रबळ उमेदवार नसल्याचे कारण पुढे करून विखे-पाटील यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध करत आरपीआयला ही जागा देऊ नये, अशी भूमिका फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडली,’ असे आठवले यांनी सांगितले.