कोपरगावच्या शुक्राचार्य मंदिरात सापडले भुयार

कोपरगाव बेटातील श्री शुक्राचार्य मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना गाभाऱ्याच्या वर एक भुयार सापडले आहे. यातून थोडेसे पुढे गेल्यानंतर एक तळघर आहे. येथे 12 बाय 12 या जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली. बहुदा हे त्याकाळचे ध्यान मंदिर असावे, असा कयास लावला जात असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाळासाहेब आव्हाड यांच्या उपस्थितीत येथे संवर्धनाचे काम सुरू आहे. संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील एकमेव अतिशय पुरातन, जागृत, धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ असलेले ग्रामदैवत श्री गुरू शुक्राचार्य महाराज यांचे हे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यावरील भागात 12 बाय 12 या आकाराचे ध्यानमंदिर आढळून आले आहे. ते पाहण्यासाठी येथे भाविकांसह नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

बाळासाहेब आव्हाड म्हणाले, ‘सध्या श्री गुरू शुक्राचार्य महाराज पुरातन मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काम करताना हे ध्यान मंदिर तीन आठवड्यांपूर्वी आढळून आले. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या जगातील एकमेव मंदिर असलेल्या श्री गुरू शुक्राचार्य महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम नाशिक येथील उद्योगपती यांच्या मदतीने व सहकार्याने पूर्णत्वास जात आहे. गाभारा दुरुस्तीसमोरील सभामंडपावरील भागात कोणी, कधीही न पाहिलेली छोटीसी खिडकी आढळून आली. ती खिडकी उघडली असता सभामंडपाच्या गच्चीच्या खाली 12 बाय 12 या जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली. बहुदा हे त्याकाळचे ध्यान मंदिर असावे, असा कयास लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षापासून मंदिर परिसरात विविध बदल केले जात आहेत. पूर्वीचा श्रीक्षेत्र बेट हा दंडकारण्याचा एक भाग होता. चहुबाजूंनी त्याला पाण्याने वेढले होते. या पावनभूमीत श्री गुरू शुक्राचार्य महाराज यांचे कर्मस्थान असून, त्यांच्या वास्तव्याने घोर तपश्चर्येने पावन व पवित्र झालेला हा परिसर आहे. येथे श्री गुरू शुक्राचार्यांचा वास्तव्याचा व त्याबरोबरच भगवान शंकराकडून मिळविलेल्या संजीवनी मंत्राचा कचदेव व शुक्राचार्यांची कन्या देवयानी यांच्या प्रेमकथेचा संदर्भ आहे. त्याचा उल्लेख ययाती या कादंबरीत प्रामुख्याने आलेला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

शिवपिंडीस 17 किलो चांदीचे लेपण

n श्री गुरू शुक्राचार्य महाराजांच्या शिवपिंडीस 17 किलो चांदीचे लेपण केले जाणार आहे. त्यासाठी डॉ. रामदास आव्हाड यांनी 2 किलो व इतर शुक्रभक्तांनी चांदी देऊ केली आहे, त्याचेही काम लवकरच केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली. तसेच श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.