युवा हिंदुस्थानचा मालिका विजय; दुसऱ्या वन डेतही कांगारूंची कत्तल, साहिलचे शतक, अभिज्ञानचे अर्धशतक

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने दुसऱ्या वन डे क्रिकेट सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा 9 गडी आणि 168 चेंडू राखून धुव्वा उडवत मालिका विजय साजरा केला. कांगारूंना 176 धावांवर रोखल्यानंतर साहिल पारख (नाबाद 109) व अभिज्ञान पुंडू (नाबाद 53) या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची कत्तल करत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह युवा हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. नाबाद शतकी खेळी करणारा साहिल पारख या सामन्याचा मानकरी ठरला.

युवा हिंदुस्थानने मिळालेले 177 धावांचे माफक लक्ष्य 22 षटकांत केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात पूर्ण केले. रुद्र पटेल (10) तिसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर साहिल पारख व अभिज्ञान पुंडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी 153 धावांची अभेद्य भागीदारी करीत हिंदुस्थानला दिमाखदार विजय मिळवून दिला. साहिलने 75 चेंडूंत 14 चौकार व 5 षटकारांसह आपली 109 धावांची नाबाद खेळी सजविली, तर अभिज्ञानने 50 चेंडूंत नाबाद 53 धावा करताना 9 चेंडू सीमापार पाठविले.

त्याआधी, नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या चांगलाच अंगलट आला. हिंदुस्थानच्या सर्वच गोलंदाजांनी कमालीची कंजूष गोलंदाजी करीत पाहुण्यांना 49.3 षटकांत 176 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून मधल्या फळीतील एडिसन शेरिफ (39) व ख्रिश्चियन होवे (28) यांनाच फक्त धावांची विशी ओलांडता आली. हिंदुस्थानकडून समर्थ नागराज, मोहम्मद इनान, किरण चोरमले यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. युधाजित गुहा व हार्दिक राज यांना 1-1 बळी मिळाला.