क्रीडा खात्याचा मूर्खपणा एकमताने अमान्य; निषेध सभेत सर्व संघटनांची दिसली एकजूट

हिंदुस्थानच्या क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन आहे तो खेळाडूंमुळे. खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याऐवजी पाठीत वार करण्याचा मूर्खपणा राज्याच्या क्रीडा खात्याने केला आहे. कोणत्याही खेळाडूशी-संघटनेशी चर्चा न करता सात खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या यादीतून वगळण्याचा निर्णय आम्हाला अमान्य असल्याचा सूर लावत सर्व अन्यायग्रस्त क्रीडा संघटनांनी पुन्हा एकदा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. क्रीडा खात्याने आपला निर्णय मागे घेत सर्व वगळलेल्या सात खेळ आणि दोन उपप्रकारांना पुरस्काराच्या यादीत सन्माने स्थान द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे संघटनांनी निषेध सभेत सांगितले.

कॅरम, शरीरसौष्ठव, अश्वारोहण, गोल्फ, नौकानयन, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स आणि स्नूकर हे सात खेळ आणि जिम्नॅस्टिक्समधील ऍक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स या दोन उपप्रकारांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीतून वगळल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात राज्याच्या क्रीडा खात्यावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. या प्रकारानंतर पेटून उठलेल्या सर्व अन्यायग्रस्त संघटनांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये निषेध सभा आयोजित करत आपला संताप व्यक्त केला. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने खेळाडू आणि संघटकांनी सभेत आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. क्रीडा संघटकांची उपस्थिती पाहून आज क्रीडा खात्याचे धाबे दणाणले होते. त्यामुळे क्रीडा खाते आपला मूर्खपणा मागे घेतील, असा विश्वासही सर्व संघटनांनी याप्रसंगी व्यक्त केला. या निषेध सभेला नामदेव शिरगावकर, अरुण देशमुख, अरुण केदार, संजय सरदेसाई, संजय शेटे, अजय खानविलकर, जय कवळी, महेंद्र चेंबूरकर, देवेंद्र जोशी यांच्यासह श्याम रहाटे, अनिल राऊतसारखे अनेक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूही आवर्जून उपस्थित होते.

राज्य ऑलिम्पिक संघटना पाठीशी

लोकप्रिय खेळांना पुरस्काराच्या यादीतून वगळण्याचा क्रीडा खात्याचा प्रकार निंदनीय आहे. क्रीडा खात्याने ही कारवाई करण्याच्या आधी सर्व संघटनांशी संपर्क साधायला हवा होता, पण त्यांनी खेळांचा अपमान करत उचललेले पाऊल संघटना कधीच मान्य करू शकत नाही. सर्व खेळांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना तुमच्या पाठीशी खंबीरमध्ये आहे. यासाठी आम्ही क्रीडा खात्यापासून क्रीडामंत्र्यांपर्यंत सर्वांची भेट घेऊन निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करणार असल्याचे ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर म्हणाले.

…तर क्रीडा पुरस्कारापेक्षा मोठी रक्कम आम्ही देणार

कॅरम खेळात जागतिक स्पर्धेत विश्वविजयी कामगिरी करणाऱया संदीप दिवे, नीलम घोडके आणि अभिजित त्रिपणकर हे यंदा थेट पुरस्कारासाठी पात्र आहेत, पण क्रीडा खात्याच्या मूर्ख कारभारामुळे त्यांचा पुरस्कार हुकला तर खुद्द राज्य कॅरम संघटना तुमचा सन्मान करील आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी रक्कम पुरस्काररूपाने देईल, अशी घोषणा कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार यांनी केली.