मिंधे आणि भाजपात रक्तरंजित गँगवॉर, उल्हासनगरजवळील पाच एकर जमिनीच्या वादातून वैमनस्य

भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात द्वारली गावातील पाच एकर भूखंडावरून झालेल्या वादाची उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात सुरू असलेली मांडवली फिस्कटली आणि अवघ्या दहा सेकंदांत खेळ खल्लास झाला. आमदार गायकवाड यांनी तीन फुटांवरून महेश गायकवाड यांच्यावर अवघ्या दहा सेकंदांत सहा गोळय़ा झाडल्या. ज्युपिटर रुग्णालयात गायकवाडवर तातडीची शस्त्र्ाक्रिया करून त्यांच्या शरीरातून डॉक्टरांनी सहा गोळय़ा बाहेर काढल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सरवणकर व अन्य तिघांसह सहा जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांना उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. भाजप आणि मिंधे गटात सुरू असलेल्या या रक्तरंजित गँगवॉरमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याबाबतदेखील आता पोलीस चौकशी करणार आहेत. तपासाअंती नेमके काय समोर येतंय हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांना सुरक्षेच्या कारणास्तव कळवा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यावेळी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कळवा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.

कल्याण-डोंबिवलीमधील भाजपने कल्याण लोकसभेवर दावा केला आहे. या मतदारसंघातून भाजपचाच खासदार निवडून येईल, असे ऐलान कल्याण ग्रामीणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले होते. या लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि मिंधे गटात प्रचंड खदखद सुरू आहे. त्यातच गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगरच्या द्वारली गावातील पाच एकर भूखंडावरून मोठा वाद सुरू आहे. ही जागा आपण विकत घेतल्याचा दावा गणपत गायकवाड यांनी केला आहे. या जागेला गायकवाड यांनी संरक्षित भिंत घातली आहे, मात्र ही भिंत तोडण्यासाठी महेश गायकवाड तीनशे ते चारशे लोकांना घेऊन घटनास्थळी जाणार होता. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला. पोलिसांनी याप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात बोलावले, मात्र ही मांडवली अयशस्वी ठरली आणि त्याचे पर्यवसान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांना गोळय़ा घालण्यात झाले.

मिंधेंच्या गुंडांची देवेंद्र फडणवीसांकडे वारंवार तक्रार केली, पण त्यांनी दखल घेतली नाही.

उल्हासनगरच्या द्वारली गावात दहा वर्षांपूर्वी मी एक जागा विकत घेतली होती. मिंधे गटाचा गुंड महेश गायकवाड याने या जागेचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. कंपाऊंड तोडण्यासाठी त्याने तयारी केली होती. त्यासाठी त्याने स्थानिक लोकांनाही उचकवले होते. मिंधेंच्या या गुंडांची मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार तक्रार केली, पण त्यांनी दखल घेतली नाही, अशी खंत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पाचशे गुंडांना घेऊन महेश गायकवाड पोलीस ठाण्यात आला. माझा मुलगा पोलीस ठाण्यातून घरी चालला असताना त्याला गायकवाडच्या गुंडांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोरच ते माझ्या मुलाला हात लावत असतील तर माझा जगून काय फायदा? मी आत्मसुरक्षेसाठी गोळीबार केला, असेही गायकवाड म्हणाले.

पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत – गायकवाड यांचा आरोप

पोलीस हे मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत. माझा मुलगा आरोपी नव्हता, तरी त्याला आरोपी का बनवण्यात आले? माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला, अशी बाजू गणपत गायकवाड यांनी न्यायालयासमोर मांडली. यावेळी पोलिसांनी गायकवाड यांनीच गोळीबार केला आहे. हा सुनियोजित हत्येचा कट आहे. गोळीबारानंतर त्यांची बंदूक ताब्यात घेतली आहे. गायकवाड यांचे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे असल्याने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली.

पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये काय घडले…

द्वारली गाव येथे एकनाथ जाधव यांच्या जमिनीचा वाद सुरू आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड हे कार्यकर्त्यांसह रात्री 9 वाजल्यानंतर उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात आले होते. याच जमिनीसंदर्भात मिंधे गटाचे महेश गायकवाड, राहुल पाटील आणि चैनू जाधव साथीदारांसह तक्रार देण्यासाठी आले होते. दोन्ही गटाच्या समर्थकांचा पोलीस ठाण्याबाहेर वाद सुरू होता. त्यानंतर त्यांच्यात प्रचंड आरडाओरडा सुरू झाला. थोडय़ाच वेळात आमदार गणपत गायकवाड हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबीनमध्ये येऊन बसले. जमिनीच्या प्रकरणात दोन्ही गटांमध्ये मांडवली करण्यावरून वाद विकोपाला गेला. पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ सुरू झाल्याने अनिल जगताप हे त्यांना शांत करण्यासाठी केबीनबाहेर गेले. इतक्यात आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर काढून महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर फायरिंग सुरू केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे धावत आत आले. रिव्हॉल्व्हरमधील गोळय़ा संपल्याने गणपत गायकवाड हे खाली कोसळलेल्या महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून रिव्हॉल्व्हरच्या बटने त्याला मारहाण करीत होते. अनिल जगताप यांनी झेप घेऊन गणपत गायकवाड यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर शिताफीने हिसकावून घेतली. त्याचवेळी गणपत गायकवाड यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे यांनी केबीनमध्ये येऊन त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून महेश गायकवाडवर गोळय़ा झाडल्या. इतर पोलीस कर्मचाऱयांनी हर्षल याच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावत आमदार गायकवाड व हर्षल याला ताब्यात घेतले. मांडवली फिसकटली आणि अवघ्या दहा सेकंदांत खेळ खल्लास झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 

घटनाक्रम

रात्री 9.30 – महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांना पोलिसांनी चर्चेसाठी बोलाकले.
रात्री 9.45 – गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर गोळीबार केला.
रात्री 10.05 – जखमी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलकण्यात आले.
रात्री 10.30 – पोलीस ठाण्याच्या आवारात जमलेल्या जमाकाला पोलिसांनी हटवून परिसर रिकामा केला.
रात्री 11 – महेश गायकवाड याची प्रकृती चिंताजनक काटू लागल्याने दुसऱया रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू झाली.
रात्री 12.30 – ग्रीन कॉरिडॉर करीत महेश गायकवाडला ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
रात्री 1.00 – मिंधे गटाचे खासदार श्रीकांत ज्युपिटर हॉस्पिटल येथे पोहोचले.
रात्री 1.00 – महेश गायकवाडवर शस्त्रक्रिया सुरू झाली. ती चार तास चालली.
सकाळी 6.00 – गायकवाडवरील शस्त्रक्रिया पूर्ण.
सकाळी 8.00 – पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
सकाळी 10.00 – गणपत गायककाड यांना उल्हासनगर पोलीस ठाण्यातून कळका पोलीस ठाण्यात हलवले.
दुपारी 2.30 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाडवरील उपचाराची माहिती घेतली.
सायंकाळी 4.45 – गणपत गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयात हजर केले.
सायंकाळी 6.00 – गायकवाड यांना न्यायालयाने 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सायंकाळी 7.30 – गायकवाड यांना पुन्हा कळवा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.

मुख्यमंत्री शिंदे ज्युपिटर रुग्णालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली. तसेच पुढील उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. सीसीटीव्हीचे फुटेज सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे जे आरोपी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबीनमधील सीसीटीव्ही फुटेज लीक कसे झाले?

सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर कसे गेले? वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबीनमधील सीसीटीव्ही फुटेज लीक करून व्हायरल कसे झाले? जवळपास सगळय़ांकडे हे फुटेज आहे. यामागे कोण आहे? हे जाणूनबुजून करण्यात आलंय, असा आरोप गणपत गायकवाड यांचे वकील राहुल आरोटे यांनी न्यायालयात केला. महेश गायकवाड यांना सहा गोळय़ा लागल्याचा दावा सरकारी वलिकांनी केला. त्यावर ऍडव्होकेट राहुल आरोटे यांनी आक्षेप घेत सहा गोळय़ा लागल्या असतील तर तसे प्रतिज्ञापत्र कोर्टात द्यावे, अशी मागणी केली.

गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी केली. मात्र उल्हासनगर न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ही मागणी फेटाळून गायकवाड यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कळवा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेल्या गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी गायकवाड यांनी हत्येचा सुनियोजित कट आखूनच गोळीबार केल्याचे म्हणणे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली. त्यानंतर चोपडा न्यायालयाने गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

– न्यायालयात आणलेल्या गणपत गायकवाड यांनी पोलीस व्हॅनच्या बाहेर येऊन ‘मीडियाशी बोलायचंय… मला काही सांगायचंय’ असे ओरडून सांगितले, परंतु पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये कोंबल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आणि गायकवाड यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या दृष्टीने अशा घटना चिंताजनक

सत्तेचा गैरवापर केला जातो, अशी तक्रार नेहमी होत असते. गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे हे कळते. महाराष्ट्राच्या दृष्टीने अशा घटना चिंताजनक आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गोळीबाराच्या घटनेबाबत व्यक्त केली.

राज्यात माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू

राज्यात माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. पुण्यात चार गुंड टोळय़ांच्या प्रमुखांना जामिनावर बाहेर काढले. यातूनच एका गुंडाचा खून झाला. निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांना बाहेर काढले जात आहे. हा प्रकार उल्हासनगरमधील नसून मुख्यमंत्र्यांच्याच जिह्यातील आहे. या गोळीबाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार आहेत, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

हीच खरी मोदींची गॅरंटी आहे का?

सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने यूपी, बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करत आहेत, पोलिसांकर हात उचलत आहेत. सत्तेचा माज, बंदुकीचा कापर, बदल्याचे राजकारण यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्याला अशांत करून, भीती निर्माण करून राज्य करणे हीच खरी मोदींची गॅरंटी आहे का, असा सकाल किरोधी पक्षनेते विजय वडेट्टीकार यांनी केला.