युक्रेनचा रशियावर क्लस्टर बॉम्बहल्ला; 21 जणांचा मृत्यू, 111 जण जखमी

रशिया आणि युक्रेनमध्ये वर्षभरापासून सुरू असलेले युद्ध आणखी चिघळले आहे. युक्रेनने बलाढय़ रशियात शनिवारी क्लस्टर बॉम्बने हल्ला केल्याचा दावा रशियाने केला आहे. या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 111 जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश असून रशियातील बेरगोरेड शहरात हा हल्ला झाला. हा भाग युक्रेनच्या सीमेपासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर असून युक्रेनच्या खार्किव्ह, लुहान्स्क, सुमी या भागांना लागून आहे.

त्याआधी रशियाने युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रs डागली. यात 41 नागरिकांचा मृत्यू झाला. 2022मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने आतापर्यंतच्या इतिहासात युक्रेनवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा अल जझिराने केला आहे.

हल्ल्याचा बदला घेणार रशिया
युक्रेनच्या शनिवारच्या हल्ल्याचा नक्कीच बदला घेणार असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाने युक्रेनच्या हल्ल्याचे दहशतवादी हल्ला असा उल्लेख केला असून युद्धाची पुढची रणनीती आखण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. युक्रेनचा हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग असून रशियातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

युद्ध थांबणार नाही, आणखी काही महिने सुरूच राहणार
जेरुसलेम – युद्ध आता सर्वोच्च बिंदूवर पोहचले असून ते थांबणे अशक्य आहे. हे युद्ध आणखी काही महिने सुरूच राहील, असे सूचक विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी केले आहे. इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानचा फिलाडेल्फियाचा कॉरिडॉरही इस्रायलच्या ताब्यात असायला हवा अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. त्यामुळे या युद्धात आणखी नागरिक मारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नेतन्याहू यांच्या विधानामुळे जागतिक स्तरावर चिंता आणखी वाढली आहे.

हुथी बंडखोरांच्या 3 बोटी नष्ट
वॉशिंग्टन ः लाल समुद्रात डेन्मार्कच्या एका मालवाहू जहाजावर हल्ला करण्यासाठी आलेल्या हुथी बंडखोरांच्या 3 बोटी अमेरिकन नौदलाच्या आयसेनहॉवर युद्धनौकेने आज हेलिकॉप्टरद्वारे बॉम्बफेक करून नष्ट केल्या आणि अवघ्या 34 मिनिटांत त्या समुद्रात बुडवल्या. तीन बोटींमध्ये किती बंडखोर होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.