उजनी धरणातून 1 नोव्हेंबरपासून शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले असून, 6 जानेवारी 2024 पासून सोलापूरसाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा धरण नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले.
धरणात एकूण 72 टीएमसी पाणीसाठा असून, जिवंत पाणीसाठा फक्त 08 टीएमसी शिल्लक राहिलेला आहे. जलाशयाची एकूण पातळी 492 मीटर झालेली असून, 491 मीटरपासून धरण ‘मायनस’ पातळीत येणार आहे. एकंदरित 15 जानेवारी 2024 पर्यंत धरणातील पाणीपातळी ‘मायनस’मध्ये येत असून, शेतीसाठी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन कसे व केव्हा सोडले जाणार, याबाबत कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत निर्णय होणार आहे. यामुळे कालव्याची धरणाच्या दरवाजावरील पाणीपातळी तसेच बोगदा, सीना माढा व दहीगावची पाण्याची पातळी जानेवारी अखेर संपणार असून, 15 फेब्रुवारीपासून भीषण पाणीटंचाईला संपूर्ण सोलापूर जिह्याला तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.