नागपुरात आज छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण, जाहीर सभेत मार्गदर्शनही करणार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण नागपूरमध्ये उद्या 29 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. नागपूरच्या कळमेश्वर येथे सायंकाळी 5 वाजता हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी कळमेश्वर येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्थेने आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख भास्कर जाधव, काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, रामटेकचे खासदार शाम बर्वे, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार प्रकाश जाधव, बाळा राऊत, हर्षल काकडे उपस्थित राहणार आहेत.

लोकवर्गणीतून साकारला तेजस्वी पुतळा

25 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी पुतळा लोक वर्गणीतून तयार करण्यात आला असून या पुतळ्याची देखरेख सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनश्याम मक्कासरे यांनी दिली.

पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

नागपूर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे हॉटेल रेडीसन येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

स्थळ – कळमेश्वर

वेळ – सायंकाळी 5 वाजता