राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंधे सरकारचा खरपूस समाचार घेतला. गद्दारी केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीशी झालेली नाही, तर महाराष्ट्राशी झालेली आहे. महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झाली आहे अशा पद्धीतीने सरकार चालवले जात आहे. सर्वच बाबतीत बोजवारा उडाला असून हे सरकार घालवावेच लागेल, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
वांद्रे पश्चिम येथील हॅाटेल ताज लँडस् एन्डमध्ये महाविकास आघाडीने राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारच्या काळ्या कारभाराचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासादर वर्षा गायकवाड, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला. मुंबई असे एकमेव शहर आहे जिथे दोन पोलीस आयुक्त आहेत. आणखी पाच वाढवा, पण कारभाराचे काय? महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेतेही असुरक्षित आहेत. मग सामान्य जनतेचे काय? गद्दारांना, गद्दारांच्या कुटुंबीयांना, गद्दारांच्या सेवकांना जेवढी सुरक्षा दिलेली आहे तेवढी जनतेसाठी का वापरत नाही? जाहिरातबाजीवर जेवढा पैसा उधळता, तेवढा जनतेच्या सुरक्षेवर का लावत नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकर या आमच्या उमद्या तरुणाची हत्या झाली. ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. गृहमंत्री मोठीमोठी होर्डिंग लावतात, पण कारभाराची जबाबदारी घेत नाहीत. त्यावेळी फडणवीस यांचा राजीनामा मागितल्यावर ते म्हणाले की, उद्या गाडीखाली कुत्रे जरी आले तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल. सर्वसामान्यांच्या जिवाची तुलना कुत्र्याबरोबर करता, तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
निष्क्रिय सरकारचे आरोपपत्र आम्ही जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता जनार्दन नक्कीच याचा न्यायनिवाडा करील, याची आम्हाला खात्री आहे. जनतेसाठी लढत राहू, महाराष्ट्राला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र मोदी-शहांचा होऊ देणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी एक-दोन दिवसात निवडणुकीची घोषणा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
– सरकारच्या प्रत्येक कृतीबद्दल संशय व्यक्त केला जातो ही गंभीर बाब आहे. कालची अटक असो किंवा शिंदेला घातलेल्या गोळ्या असो. सरकारवरचा विश्वास उडाला आहे. सर्वसामान्य लोक विचारायला लागले की सरकार करते ते बरोबर की चूक इथेच सरकारचे अपयश आहे.
– दोन दोन पोलीस आयुक्त, इंटेलिजन्स असूनही आमच्यावर जेवढे लक्ष आहे, तेवढे गुन्हेगारांवर का नाही? आयबी, सीबीआय विरोधकांना खतम करण्यासाठी वापरताहेत आणि गुन्हेगार मोकाट फिरताहेत.
– मविआच्या अडीच वर्षाच्या काळात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. पण महाराष्ट्रात कुठेही जातीय दंगल झाली नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न असून जातीय दंगली करायच्या आणि त्याच्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झाला नाही आणि पुढेसुद्धा होणार नाही.
– पोलिसांचा उपयोग गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जातो. गृहमंत्र्यांनी सांगावे की सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत आणि यांच्याकडे जे गद्दारी करून आले, खोके घेऊन आले, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना किती सुरक्षा दिली?
– भाजपची एवढी दयनीय अवस्था झाली की चोरांना आणि गद्दारांना नेता मानावे लागत आहे, त्यांच्या नेतृत्वात ते निवडणूक लढणार आहेत का?
– ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती अशी होणार आहे.
– इंग्रजांची तोडा, फोडा, राज्य करा ही निती भाजप वापरतंय. त्यांच्या भूलथापांना महाराष्ट्र बळी पडणार नाही.
– आमचे हिंदूत्व हृदयात राम आणि हाताला काम आहे. धार्मिक भावना भडकावून काय मिळणार आहे? जातीपातीत तेढ निर्माण करून शेवटी घरातील चूल नाही, घरं पेटणार आहेत. आम्हाला घरं नाही चूली पेटवायच्या आहेत.
– हरियाणाबरोबर काश्मीरचा निकाल लागलेला आहे. कश्मीरमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला त्यावर आपण बोलत नाही.
– प्रत्येक राज्याची गणितं वेगळी आहेत. महाराष्ट्र देशाला दिशा देत असतो.