भाजपला सोडलंय, हिंदुत्व नाही… आम्ही देशभक्त आहोत, मोदीभक्त नाही; उद्धव ठाकरे यांचा वज्राघात

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत प्रत्युत्तर देत घणाघात केला. आम्ही मोदीभक्त नाही. देशभक्त आहोत, असा वज्राघात उद्धव ठाकरे यांनी केला.

हल्ली मी काही बोललो तरी अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. आता त्याच्याबद्दल काही जणांच्या पोटात दुखलं. काल फडणवीस म्हणाले तिकडे गेले तर हिंदू शब्द सोडला. मी हिंदू शब्द सोडला नाही, सोडणार नाही, हिंदुत्व कधी सोडणार नाही. मी भाजपला लाथ घातली आहे. हिंदुत्व कसं सोडेन. पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत का? कारण या देशात देशभक्ती हा गुन्हा झाला आहे का? फक्त मोदीभक्त पाहिजेत? आम्ही मोदीभक्त नाहीत. आम्ही देशभक्त आहोत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

खांडके बिल्डिंगचा हा जो काही परिसर आहे, हा शिवसेनेचा केंद्रबिंदू किंवा शिवसेनेचं जन्मस्थान म्हणतात त्यातला हा परिसर आहे. लालबाग परळपासून इथेपर्यंत आणि संपूर्ण मुंबई. फार पूर्वी मी इथे यायचो. शिवसेनाप्रमुखांची एक जाहीर मुलाखतही इकडेच झाली होती. काका कुलकर्णींच्या घरी एक दोनदा आलेलो आहे. भाईयो और बहनो मेरा और आपका बहोत पुराना रिश्ता है, असं मी म्हणार नाही. हा आमचा रिश्ताच आहे. तो कोणी तोडू शकत नाही. जसं आयपीएलच्या मॅचेस सुरू आहे, एखादा सामना रंगात येतो आणि इतके चेंडू आणि इतक्या धावा. तसं मला टेन्शन नाहीये. सामना तर जिंकलेलाच आहे. पण हा सामना जिंकल्यानंतर आता शेवटच्या फोर आणि सिक्स किती मारायच्या आहेत, त्या मी मारतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता परिवाराला काल मी मुलाखत दिली. त्यात एक मुद्दा मांडला. कारण वापरा आणि फेकून द्या, या पद्धतीने हल्लीचा भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि त्यांचा सगळा कंपू वागतोय. दोन वेळेला 2014, 2019 ला त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा घेतला आणि पंतप्रधान झाले. आणि आता नकली सेना म्हणायला लागलेत. मला नकली संतान म्हणायला लागलेत. एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील, हा दिवस आता लांब नाहीये. मी बोललो खरा. पण आज इंडियन एक्स्प्रेसमध्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांची एक मुलाखत आली आहे. आम्ही आता स्वयंपूर्ण झालो आहेत. भाजप आता स्वयंपूर्ण झाला आहे, आम्हा आता संघाची गरज नाही, असं नड्डांनी सांगितलं आहे. म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे. ज्या प्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. मोदींनी त्यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा उभारला आहे. सरदार पटेल हे लोहपुरुष होते. त्यांचं कर्तृत्व होतं. हेच कर्तृत्व दाखवताना त्यांनी संघावर बंदीही घातली होती. पण त्यांनी संघावर जी बंदी घातली होती तो गुण मोदींनी घेतलाय की काय? म्हणजे पुढचा धोका हा संघाला आहे. 2025 ला संघाचे शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सोळावं वरिस धोक्याचं, असं आपण मराठीत म्हणतो. तसं संघाच्या बाबतीत शंभरावं वरिस धोक्याचं होतंय. म्हणजे शंभराव्या वर्षी संघच असणार नाही, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेना केला साडे तीन कोटींचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

जे मोदी सांगता ही नकली सेना. ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. कशी विलीन होणार, आम्ही आहोत इथे. ही खांडके बिल्डिंग त्याची साक्ष आहे. आम्ही कुठे विलीन होणार नाही. जो अन्याय आमच्यावर करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. त्याच्यामुळे आमची काळजी करू नका. पण संघावर तुम्ही बंदी आणणार आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं भारतीय जनता पक्ष म्हणजे भाकड जनता पक्षाची 4 जूननंतर काय हालत होईल ते बघा. कारण सरकार कोसळणार. तुम्ही सगळे भाडोत्री गोळा केले आहेत. तिकडे सगळे जमले होते, सगळे भाडोत्री होते. हक्काचं कोणीच नाही. इकडून तिकडून आणले होते. त्यांनी मैदानही त्यांच्या नावाने बुक केलं नव्हतं. तुमच्या नावाने मैदानही बुक होत नाही आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार? यांच्या या भूलथापा आपण पाहिल्या, असं म्हणत उद्धव ठाकरे बरसले.

मुंबईचे उद्योगधंदे यांनी गुजरातमध्ये पळवले. हिरेबाजार नेला. आपल्याकडे होणार जे आर्थिक वित्तीय केंद्र, जे काँग्रेस सरकारने दिलं होतं. आपलं सरकार होतं तेव्हा करोना होता. उद्याचे आपले खासदार अनिल देसाई यांनी त्याचा उल्लेख केला. जिथे आपण फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं. जसं चीनने 15 दिवसांत फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं. तसं आपल्या महाराष्ट्राने 17 दिवसांत फिल्ड हस्पिटल उभं केलं होतं, याचं मला समाधान आहे. हजारो लोकांचे प्राण वाचवले. आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर यांनी पहिला निर्णय घेत ते फिल्ड हॉस्पिटल पाडलं आणि ती आपल्या मोक्याची जागा बुलेट ट्रेन म्हणजेच गुजरातच्या घशात घातली. तुम्हा सगळं गुजरात… गुजरात… मग इथे जो राहणारा भूमिपूत्र आहे, मराठी माणूस आहे, त्याच्या भविष्याची चिंता कोणी करायची? काल मोदी म्हणाले मुंबईला असं करेन, तसं करेन. पण तुम्ही मुंबईला भिकारी करताय. माझ्या मुंबई महापालिकेच्या 90 हजार कोटींच्या एफडी होत्या, त्या आता तुम्ही तोडायला लागलात. पाच हजार कोटी आता ते एमएमआरडीएला देताहेत. संपूर्ण योजना ही सरकारची आणि भार मात्र महापालिकेच्या डोक्यावर. कशी देणार आम्ही तुम्हाला मतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपचा जाहीरनामा हा ‘खाओवादी’ आहे; उद्धव ठाकरे कडाडले; फडणवीस यांचाही घेतला समाचार

दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत जो रोड शो झाला, तो रोड शो हिणकस होता. तिथेच ते आशियातलं मोठं होर्डिंग हे त्यांच्याच बगलबच्च्यांनी उभारलं होतं. कारण महापालिकेची त्याला परवानगी नव्हती. त्यांचेच बगलबच्चे. त्यांचा फोटो मोदींसोबतही आहे. ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये किती लोक गेली याचा खरा आकडा आलेलाच नाहीये. पण ती घटना घडल्यानंतर दोन दिवसांतच त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरून वाजत गाजत तुफान मस्तवाल रोड शो केला. लेझिम, ढोल ताशा, फुलं उधळत. कशाल हे सगळं, त्यांचा तुम्ही शोक करायला आला होता, फुलं उधळत? पण तो रोड शो त्यांनी केला. त्या रोड शोसाठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा, मुंबई महापालिकेचा किमान पाच ते दहा कोटी रुपयांचा खर्च करवला. हे निवडणूक आयोगाला चालतं? पंतप्रधान जरी असले तरी तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता? हे निवडणूक आयोग तर काही दखल घेणार नाही. 4 जूननंतर हे निवडणूक आयुक्त ठेवायचे की नाही ते बघू. पहिले यांचे घरगडी बदलावे लागतील. एक चांगला निष्पक्ष असा निवडणूक आयुक्त आपल्याला तिकडे द्यावा लागेल. जो दूध का दूध, पाणी का पाणी करेल. यांच्याकडे गटाराचं पाणी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात. ही अशी सगळी आयुष्यातील दहा वर्षे आपली गेल्यानंतर आपण यांना मतं का द्यायची? असं उद्धव ठाकरे म्हणाले.

इकडे तर सामना कोणात आहे? ह्यांच्याकडे तर उमेदवार नाहीये. आपलीच गद्दर पोरं कडेवर घेऊन ते फिरतायेत सगळीकडे. म्हणून मी म्हणतो भारतीय जनता पक्षाला राजकारणात पोरचं होत नाहीत. त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात. इकडे अनिल देसाईसारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिला आहे. अनिल देसाई यांच्या राज्यसभेतले व्हिडिओ कदाचित तुम्ही पाहिले असतील, पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील. कर्नाटकातला रेवन्ना, बलात्कारी. त्याच्याकडे त्या व्हिडिओ क्लिप होत्या. तसा इथला उमेदवार आहे समोरचा, असं म्हणता तुम्ही? असं उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मग तुमचा प्रतिनिधी जो देशाच्या लोकसभेत जाणार तो रेवन्ना पाहिजे की शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाई पाहिजे? हा विचार तुम्ही करायचा. असं म्हणताच उपस्थितांनी पुन्हा शिट्ट्या आणि टाळांच्या कडकडाट केला. हे सगळे असे चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी जमवून तरी त्यांना ते पूर्ण पडत नाही, म्हणून कोणतरी नावाला पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी एक आडनावाचा पाहिजे, तो सुद्धा त्यांनी भाड्याने घेतलाय. सुपारी बाज नको, खोकेबाज नको आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान अगदी कट्टर शिवसैनिक उमेदवार म्हणून दिला आहे. अनिल देसाई माझ्याहून वयाने मोठा आहे तरीसुद्धा मी त्याला हक्काने अरे तुरे म्हणतो. इतका तो जवळचा माणूस आहे. कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळची असतात आणि वेळ पडल्यावर तेच आपल्याविरूद्ध लढायला उभे राहतात. ह्यांना कितीही दिलं तरी पोटचं भरत नाही. असे सगळे मतस्तवाल झालेले आणि गद्दारी करणारे लोक आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

हा दादर परिसर कट्टर शिवसैनिकांचा आहे. मुद्दाहून मी इथे आलो. सभा कुठे घ्यायची तर खांडके बिल्डिंगच्या इथेच घेऊ. कारण हे माझ्या शिवसेनेचे बलस्थान म्हटल्यानंतर तुमच्या सर्वांचे दर्शन आणि आशीर्वाद पाहिजेच. ते आशीर्वाद मी घ्यायला आलो आहे. निवडणुकीत कोणाला मत द्यायचं तुम्ही ठरवलेलं आहे, याची मला खात्री आहे. आहे ना? असं विचारताच लोकांनी मशाल… मशाल… अशी घोषणा देत जोरदार प्रतिसाद दिला. आणि मुद्दाहून गोंधळ होण्यासाठी आपली जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या हातात दिली आहे. मग आपल्या हातात काय आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारताच सर्व उपस्थितांनी एकमुखाने मशाल… म्हणत परिसर दणाणून सोडला.

काही ठिकाणी खोके उघडले गेले आहेत. खोक्यातला माल आता वाटायला लागले आहेत. पण ते खोट्या नोटा वाटत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. त्याच्यातही जुमलाच आहे. मतदार आता पेटलेला आहे. ग्रामीण भागात अनेकांनी गावात खोके उतरूच दिले नाहीत. दार उघडायचं नाही, उघडलं तर याद राखा… गेट आउट म्हणत त्यांना हाकलून दिलं. हा असा शापाचा आणि पापाचा लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ. आणि एका जिद्दीने महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशच पेटलेला आहे. 4 तारखेला नरेंद्र मोदीजी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला या, हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय. आज का निंमत्रण देतोय. कारण खुर्चीवर माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व असतं. नंतर त्याला कोण विचारत नाही. पण मला मुद्दाम नरेंद्र मोदी आणि अमित शहांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलवायचं आहे. त्यांना दाखवून दिलं पाहिजे तुम्ही जी दहा वर्षे थापा मारल्या. आता खरं चार जूननंतर देशाचे अच्छे दिन सुरू होताहेत. म्हणून मोदी, अमित शहा तुम्ही आम्हाला लुटलंत, छळलं तेवढं खूप झालं. जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो, अशा शुभेच्छा मोदी-शहांना देतो. आणि तुम्हाला सर्वांना अनिल देसाई यांच्या विजयाची जबाबदारी देतो, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.