मोक्याचे भूखंड अदानी – लोढाच्या घशात आणि मराठी माणसाला मिठागरावर फेकून द्याल तर खबरदार! उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला झोडपले

वांद्रे सरकारी वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी घर देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी मुख्यमंत्री असताना कॅबिनेटमध्ये घेतला. कोर्टासाठी दुसरी जागा सुचवल्यानंतर त्याला सरन्यायाधीशांनीही मान्यता दिली. मात्र गद्दारी करून सत्तेवर आलेल्या मिंधे सरकारने आता या ठिकाणच्या इमारती पाडण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणाहून हद्दपार करण्याचा डाव मिंधे सरकारचा आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. मात्र मोक्याचे भूखंड अदानी आणि लोढाच्या घशात घालायचे आणि मराठी माणसाला मिठागरात फेकून द्यायचे, हे शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी मिंधे-भाजप सरकारला चांगलेच झोडपले.

चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझरमधील शिवसेना युनियनच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारच्या बिल्डरप्रेमी धोरणाचा भंडाफोड केला. मी मुख्यमंत्री असताना वांद्रे सरकारी वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत कर्मचाऱ्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे तत्कालीन सरन्यायाधीशांनी आपल्या भूमिकेला पाठिंबा दिला. मग आता यामध्ये मिंधे सरकार खडा का टाकत आहे, असा सवालही त्यांनी केला. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना वांद्रे  वसाहतीमध्येच घर मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. सरकार म्हणजे केवळ मुख्यमंत्री नाही. तर खरं सरकार हे कर्मचारी चालवतात, असेही ते म्हणाले. आमच्याकडे वैचारिक विचारांचे बियाणे आहे. आजोबांनी वडिलांना आणि आम्ही मुलांना देतोय. पेरतोय. त्याला खतपाणी देतोय. ज्या निष्ठेने इतकी वर्षे कितीही संकटे आली तरी तुम्ही ढळला नाहीत, पळाला नाहीत, असे गौरवोद्गार काढत स्थिरावलेल्या माणसाची हीच खासीयत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘आरसीएफ’ म्हणजे अन्नदात्यांना खतं, बी-बियाणे देणारी संस्था. ही कंपनी शेतकऱ्यांना आपली वाटते. राष्ट्रीय विचारांना खतपाणी घालणारी मोठी संघटना. या राष्ट्रीय विचारांचे बियाणे आणखी सक्षम व्हायला हवे. अंकुर फुटायला हवेत. सक्षम व्हायला हवे. हे विचार आता पह्फावायला हवे, असेही ते म्हणाले. या ठिकाणी शिवसेनेची युनियन आहे आणि म्हणून तुमचे काम मोठे आहे. आतापर्यंत तुम्ही बोगस बी-बियाणे उखडून टाकले. हेच काम पुढे केले पाहिजे. बाकीची बोगस बियाणे रुजू देऊ नका. आपल्याच बियाण्याला अंकुर फुटले पाहिजेत, असेही ते म्हणाले. यावेळी युनियनचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, कर्मचारी सेनेचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश फातर्पेकर, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, आरसीएफचे सेना युनिट अध्यक्ष दत्तात्रय परब आणि कर्मचारी सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

…तर वांद्रे रेक्लमेशनची जागा देणार का!

कोरोना काळात आम्ही फिल्ड हॉस्पिटल बांधून हजारो जीव वाचवलेला भूखंड दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन बुलेट ट्रेनसाठी दिला. या बुलेट टेनचा कुणाला फायदा होणार आहे? तुम्ही अहमदाबादला ढोकळा, फाफडा खायला जाणार का? असा प्रश्नही त्यांनी केला. तर वांद्रे येथील सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांची जागा अदानी-लोढाच्या घशात घालत असाल तर अदानीला वांद्रे रेक्लमेशन येथे दिलेला भूखंड सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी देणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मिंध्यांनी दिल्लीच्या मालकाची सुपारी घेतलीय

मराठी माणसाला हद्दपार करण्याची सुपारी मिंध्यांनी दिल्लीच्या मालकाकडून घेतली आहे. मात्र आता या सरकारचे दोन-तीन महिनेच राहिले आहेत. त्यामुळे आपण कुणाला खासगीकरणाची खाज आलीय ते आपण बघून घेऊ, असा थेट इशाराही त्यांनी दिला. मिंधे-भाजपची ही घाणेरडी व्यापारी वृत्ती म्हणजे मुंबईला खतम करण्याचा डाव आहे. मराठी माणसाला बेकार करायचे, असे कारस्थान सुरू असल्याचेही ते म्हणाले. हे रोखण्यासाठी लढा उभारावा लागेल, असेही ते म्हणाले.

गरज नाही ते आमच्या डोक्यावर का लादता!

धारावीमधील जास्तीत जास्त लोकांना अपात्र ठरवून मुलुंड, दहिसर आणि मिठागरांमध्ये फेकून द्यायचे आणि मोक्याचे भूखंड अदानी-लोढाच्या घशात घालायचे असे कारस्थान सुरू असल्याचा घणाघात करीत ज्याची गरज नाही त्या गोष्टी आमच्या डोक्यावर का लादता, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. तुमच्या खासगीकरणाचा तर विषयच नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी खासदार, आमदाराप्रमाणे या ठिकाणी नगरसेवकही आपलेच निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनेचा भगवा हाती घेऊन अभिमान वाटेल असे पवित्र काम आपण करीत आहोत. मात्र काहीजणांना वाट्टेल तेव्हा वाट्टेल ती फडकी फडकावून महाराष्ट्राला, मराठी माणसाला नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान सुरू आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याची सुपारी मिंध्यांनी दिल्लीच्या मालकाकडून घेतली आहे. मात्र हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही.

मुंबईला खतम करण्याचा डाव ही मिंधेभाजपची घाणेरडी व्यापारी वृत्ती आहे. यामध्ये मराठी माणसाला बेकार करायचे आणि मतांसाठी लाच देऊन पुन्हा तुमच्या डोक्यावर बसण्याचा प्रकार सुरू आहे. आता आरसीएफदेखील अदानीच्या घशात घालणार का? मिंधे सरकारने मुंबई विकायला काढली आहे. हे रोखण्यासाठी एकजुटीने लढा उभारावा लागेल.