धाराशीवमध्ये उद्धव ठाकरे गरजले, ही लढाई वाघ विरुद्ध लांडगे यांची

ज्या ज्या वेळी असूर माजले त्या त्या वेळी जगदंबेने अवतार घेतले. म्हणूनच तिला महिषासुरमर्दिनी म्हणतात. त्यामुळेच माझे तमाम महिलाशक्तीला आवाहन आहे, तुम्ही महिषासुरमर्दिनी बना आणि देशात जो हुकूमशहा माजू पाहतोय त्या हुकूमशहासुराचे मर्दन करून भारतमातेचे रक्षण करा.

आगामी काळात होणारी लोकसभेची निवडणूक ही देशाचे भविष्य निश्चित करणारी आहे. वाघ विरुद्ध लांडगे, बेइमानी विरुद्ध इमानदारी, गद्दारी विरुद्ध निष्ठा अशी ही लढाई आहे. तुम्ही कोणत्या बाजूने आहात, हे तुम्हाला ठरवायचे आहे. येणारी निवडणूक लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारी आहे. सांगा तुम्ही कुणाच्या बाजूने, बेइमान की इमानदारीच्या बाजूने, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारताच जनसमुदायाने वज्रमूठ आवळून इमानदारीच्या बाजूने अशी ग्वाहीच दिली.

उद्धव ठाकरे यांच्या जनसंवादाने धाराशिव जिल्हय़ात भगवे तुफान उठले आहे. कळंब येथे आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदान तसेच भूम येथे उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद सभा झाल्या. यावेळी तुडुंब गर्दी उसळली होती.

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी दांडपट्टाच फिरवला. ते म्हणाले. आज जागतिक महिला दिन आहे. तिकडे मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. त्या बोलूही शकत नाहीत. महिला कुस्तीपटू शोषणाविरुद्ध लढत आहेत. या महिला मोदींच्या परिवाराच्या हिस्सा नाहीत का? महिलांनी आता शुभेच्छा घेऊ नयेत. आता महिलांनी महिषासूरमर्दिनीचे, कालीमातेचे रूप धारण करून या हुकूमशहासुराचे निर्दालन करावे!

नार्वेकरांना लोकसभा उमेदवारीची लालूच दाखवली

पश्चिम बंगालमध्ये गंगोपाध्याय नावाच्या न्यायाधीशांनी भाजपचे गोमूत्र अंगावर शिंपडून घेतले. न्यायाधीश असताना याच गंगोपाध्यायांनी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात अनेक निकाल दिले आहेत. मग तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्याचे पावित्र्य राखलेत कशावरून? लबाड नार्वेकरचेही तसेच. लोकसभेच्या उमेदवारीची लालूच दाखवून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधात निकाल द्यायला लावला, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

शेतकऱयांनो, ताकद दाखवा

देशात सध्या शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. आपले ऐकणारे कोणी नाही म्हणून तो आत्महत्या करतोय. पण आत्महत्या करू नका. या सरकारचीच राजकीय हत्या करा. दाखवा तुमच्या मनगटातील ताकद! शेतकरी काय मोदी परिवाराचा भाग नाहीत का? शेतकऱयांवर बंदुका रोखणारे हे नालायक सरकार! हे मोदी सरकार जाणारच आहे. हे सरकार ज्या दिवशी जाईल त्या क्षणापासून अच्छे दिन येतील, कारण आपले सरकार दिल्लीत येणार आहे, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

खेकडय़ाची नांगी ठेचावीच लागेल

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात खेकडाफेम गद्दार मंत्री तानाजी सावंत यांचा कडक शब्दात समाचार घेतला. सत्तेची मस्ती फार काळ चालत नाही. त्यामुळे या खेकडय़ाची नांगी तुम्हाला ठेचावीच लागेल. ठेचणार का, असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच लोकांनी हात उंचावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
जिवंत असेपर्यंत ठाकरेंसोबतच
भूम-परंडय़ाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे प्रकृती बरी नसतानाही जनसंवाद सभेला आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आज मी जो काही तो केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच अशी कृतज्ञ भावना व्यक्त करतानाच जिवंत असेपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार  असे सांगितले.
 
भाजप खासदार मराठा आरक्षणावर का बोलले नाहीत
धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संसदेतील कामाचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर काwतुक केले. ओमराजे हे या भागातले प्रश्न तर पोटतिडकीने मांडतातच. पण शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण, सोयाबीन आदी प्रश्नांनाही त्यांनी संसदेत वाचा पह्डली. ओमराजे विरोधात असतानाही बोलतात. मग भाजप खासदारांची दातखिळ का बसते? भाजपच्या एका तरी खासदाराने मराठा आरक्षणावर तोंड उचकटले का, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

न्यायव्यवस्थेत भाजपची काळी मांजर

पश्चिम बंगालमधील न्या. गंगोपाध्याय यांच्या भाजप प्रवेशावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टीकेची झोड उठवली. याच गंगोपाध्यायांनी न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून तृणमूल काँग्रेसच्या विरोधात अनेक निकाल दिले. ज्या खुर्चीत तुम्ही बसलात, त्या खुर्चीचे पावित्र्य तरी तुम्ही ठेवलेत का? न्यायदानासारख्या पवित्र क्षेत्रातही भाजपची काळी मांजर बसली आहे मग सांगा न्याय कुणाकडे मागायचा, असा मर्मभेदी सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

कळंब तालुका कायम शिवसेनेच्या पाठीशी

कळंब तालुका म्हणजे निष्ठावंतांची खाण! या तालुक्याने कल्पनाताई नरहिरे, दयानंद गायकवाड, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासारखे लखलखणारे हिरे दिले. याच परंपरेचा मीदेखील पाईक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, असे आमदार पैलास पाटील म्हणाले. मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मंजुर केली. कृष्णा पाणी प्रश्नावरही त्यांनी बैठका घेतल्या. आता भाजपच्या काळात हा 4700 कोटींचा प्रकल्प 12 हजार कोटींवर गेल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. कळंबच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाला मंजूरी मिळाली. मी गद्दारांच्या बाजारात गेलो नाही म्हणून 135 कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली. निष्ठा हाच माझा श्वास आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती मातोश्रीसोबत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

माजी आमदार दयानंद गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट

शिवसेनेचे माजी आमदार दयानंद गायकवाड यांच्या कळंब येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गायकवाड कुटुंबीयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार पैलास घाडगे पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, सहसंपर्कप्रमुख शंकर बोरकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शरद कोळी, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, महिला आघाडीच्या श्यामल वडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे पांडुरंग पुंभार उपस्थित होते.

हे माझे शिवसेनेचे वाघ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाषणासाठी उभे राहताच ‘कोण आला रे… कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’! ‘पन्नास खोके.. एकदम ओक्के’… अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. घोषणा टिपेला गेल्या असतानाच उद्धव ठाकरे यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार पैलास घाडगे पाटील यांना जवळ बोलावून घेतले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हे माझे शिवसेनेचे वाघ आहेत, यांची निष्ठा अनमोल आहे, असे म्हणत दोघांच्याही पाठीवर काwतुकाची थाप देताच संपूर्ण सभेने टाळय़ांचा कडकडाट केला.

हा तर अफजलखानी कावा

जेव्हा तुम्ही कुणीही नव्हता. तेव्हा आम्ही तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला. आता तुम्ही शिवसेनेलाच संपवायला निघालात. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे आमच्या कुटुंबातलेच. आम्ही मानतो तसे. त्यामुळेच 2014 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नाही. अमित शहांनी शब्द दिलाच नव्हता, असे रावसाहेब दानवे म्हणाले. दानवेचं दैवत अमित शहा आहेत. माझं दैवत तुळजाभवानी माता आहे. तुळजाभवानीची शपथ घेऊन मी कालच बाळासाहेबांच्या खोलीत तेव्हा काय झाले हे सांगितले आहे. अमित शहा यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता आणि हेच सत्य आहे. सांगा तुमचा कुणावर विश्वास आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केला. भाजपचा हा अफजलखानी कावा! लोकशाहीला त्याने मगरमिठी घातली आहे. येणारी लोकसभेची निवडणूक ही देशाची दिशा ठरवणारी आहे. ‘हर हर महादेव…’, ‘जय भवानी जय शिवाजी’चा नारा देत हुकूमशाहीला गाडून टाका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.

मातोश्रीवर काय सत्यनारायणाच्या प्रसादाला आला होता

आता भाजपवाल्यांनी नवीनच सुरू केले आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख नाही असे म्हणतात. माझे तर अमित शहांना खुले आव्हान आहे. जनतेसमोर या एकदा आणि होऊनच जाऊ द्या. विचारा शिवसेना कुणाची, शिवसेना पक्षप्रमुख कोण? शिवसेना कुणाची, असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच सभेतून एकमुखाने आवाज आला ‘बाळासाहेबांची’!  शिवसेना पक्षप्रमुख कोण… उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, असे म्हणत शिवसैनिकांनी आसमंत दणाणून सोडला. मी पक्षप्रमुख नाही असे म्हणता, मग 2019 मध्ये मातोश्रीवर काय सत्यनारायणाची पूजा होती, प्रसाद घ्यायलाच आला होतात ना! मतांचा! मतेच पाहिजे होती तुम्हाला शिवसेनेची. शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणूनच मला अहमदाबादला तुमचा, वाराणसीला मोदींचा अर्ज भरण्यासाठी बोलावले होते ना. होय, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहेच! ही शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. खोक्याच्या जीवावर आमदार, खासदार पह्डलेत पण ही संपत्ती कशी पह्डणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

गद्दारांच्या छाताडावर तांडव करा

तळपत्या उन्हात निष्ठावंतांचा हा महासागर उफाळलाय. याला भाग्यच लागते. आज महाशिवरात्र आहे, गद्दारांच्या छाताडावर तांडव करून त्यांना कायमचे गाडून शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने महाराष्ट्रावर फडकवायचा आहे, असे आवाहन  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
डरपोक लोकांसाठी शिवसेना नाही, केवळ मर्दांनी शिवसेनेत रहावे. गद्दारांना ही जनता कधीही माफ करणार नाही. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार पैलास पाटील यांचा खोके पॅटर्न नसून ‘ओके’ पॅटर्न आहे. हा पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात राबवू, असे खासदार संजय राऊत म्हणाले. भूम येथील सभेत तर संजय राऊत यांनी ‘खेकडा’ फेम आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भ्रष्टाचाराची यादीच वाचून दाखवली. आता या भ्रष्टाचाऱयाला त्याची जागा जनताच दाखवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.