शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र मोदी-शहांच्या हातात जाऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला

शिवतीर्थावरील शिवसेनेच्या अतिविराट दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेच्या लढाईचे रणशिंग फुंकले. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱया आणि शिवसेना नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे रचणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांनी ललकारले. येणारी लढाई महाराष्ट्राची ओळख ठरवणारी आहे असे सांगतानाच, जिवात जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत माझा महाराष्ट्र मोदी-शहांचा होऊ देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र मोदी-शहांच्या हातात जाऊ देणार नाही, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवतीर्थावर पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. हा मेळावा अतिविराट असा झाला. मेळाव्याला विक्रमी गर्दी झाली होती. त्या गर्दीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा, मोदी-शहा यांच्यावर कडकडीत आसुड ओढले. गद्दारांची अक्षरशः सालटी सोलून काढली. मिंधे सरकारच्या भ्रष्टाचारावर उद्धव ठाकरे यांनी एकामागोमाग एक तोफगोळे डागले.

सर्वांना दसऱयाच्या शुभेच्छा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्र असतात, कुणाकडे तलवार आहे, कुणाकडे गन आहे, कुणाकडे मशीनगन आहे, पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. ते पुढे म्हणाले की, ठाकरे कुटुंबीयांनी आज विजयादशमीदिनी इतर शस्त्रांबरोबरच शिवसेनाप्रमुखांच्या पुंचल्यांचीही पूजा केली. त्याच पुंचल्यांनी बाळासाहेबांनी महाराष्ट्रद्रोह्यांवर फटकारे मारले आणि मराठी माणसाच्या मनगटात चेतना फुलवली, असे सांगतानाच, तुम्हीसुद्धा माझी शस्त्रs आहात आणि आता तुमची पूजा करत आहे, असे उद्धव ठाकरे उपस्थित विराट गर्दीकडे नजर फिरवत म्हणाले.

दिल्लीकरांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकावेन

येणारी लढाई साधी नाही. एका बाजूला बलाढय़ अब्दालीसारखी माणसं आहेत. पेंद्राची सत्ता आहे, शासकीय यंत्रणा आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करायचे ठरवले आहे. पण शिवसेना ही वाघनखं बाळासाहेबांनी मला दिलेली आहेत. शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनतेचे पाठबळ नसते तर मी उभा राहू शकलो नसतो. गद्दारांनी सर्व ओरबाडून घेतल्यानंतर फक्त तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबेसारखे माझ्यासोबत उभे राहिलात. त्यामुळे मला दिल्लीकरांची पर्वा नाही. किती पिढय़ा यायच्या तितक्या येऊ द्या, त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

टाटांनी सामान्यांना टाटा नमक दिले, आजचे उद्योगपती मिठागरे गिळताहेत

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना आजच्या दसरा मेळाव्यात सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणे दुर्मिळ झाले आहे. रतन टाटांसारखे उद्योगपती विरळ असतात. टाटांनी अनेक गोष्टी दिल्या. आपल्या जेवणातील लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिले. आजचे उद्योगपती मिठागरे गिळत आहेत, असा टोला त्यांनी अदानी यांचा नामोल्लेख न करता लगावला. टाटा गेल्याचे दुःख वाटते आणि मिठागरे गिळणारे जात का नाहीत याचे वाईट वाटते. जे जायला पाहिजेत ते जात नाहीत, जे जाऊ नयेत ते जाताहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जे. आर. डी. टाटा यांनी माझे काम पाहून टाटा समूहाचा वारसा चालवण्यास माझी निवड केली तसेच कठीण काळात तुम्ही कसे निर्णय घेता हे पाहून शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना तुमच्याकडे सोपवली, असे रतन टाटा ‘मातोश्री’ भेटीत म्हणाले होते याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

…अदानीने आम्हाला मुंबई दिलेली नाही

धारावीच्या माध्यमातून सरकार मुंबई लुटून अदानीला देत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, काय नाही दिलं अदानीला. चंद्रपूरची शाळा दिली, कुर्ला मदर डेअरी, मिठागरे व अन्य सर्व जागा दिल्या. सब भूमी अदानी की झाली. का आम्ही जगायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात आम्ही मुंबई मिळवली. अदानीने आम्हाला मुंबई दिली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी माझ्यासाठी नाही तर मुंबई आणि मुंबईकरांसाठी लढतोय असे सांगताना, महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करू अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. आपले सरकार धारावीत पोलीस, गिरणी कामगार आणि नाईलाजास्तव मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना घरे देईल असेही ते म्हणाले.

बिल्डरांच्या झोळ्या भरणारे मिंधे सरकारचे निर्णय रद्द करू

मिंधे सरकारने 11 दिवसांत तब्बल 1600 शासन निर्णय जारी केले. भ्रष्टाचारी सरकारची ही मस्ती असून यातील अनेक निर्णय महाविकास आघाडीचे सरकार रद्द केल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या मुळावर येणारे, बिल्डरच्या झोळ्या भरणारे निर्णय रद्द करूच पण सरकारच्या या पापात सहभागी झालेल्या अधिकाऱयांनाही तुरुंगात टाकू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दोन महिने थांबा, आपली सत्ता येतेय… आपलं सरकार आल्यावर धारावीचे टेंडर रद्द करणार… धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन करणार… पोलीस, गिरणी कामगार आणि मिंध्यांच्या जुलमी राजवटीत मुंबईबाहेर फेकल्या जाणाऱया मराठी माणसांनाही धारावीतच घरे देणार!

महाराष्ट्र अदानीचे मंगळसूत्र बांधणार नाही

मोदी म्हणाले होते की, हे लोक तुमची मंगळसूत्रं काढणार आणि ज्यांची जादा मुले आहेत त्यांना देणार. मग मी आता विचारतोय की, तुम्ही काय संपूर्ण महाराष्ट्र लुटून महाराष्ट्रातील महिलांचे मंगळसूत्र लुटून अदानीला देणार आहात की अदानीचे मंगळसूत्र माझ्या महाराष्ट्राच्या गळ्यात बांधणार आहात? महाराष्ट्र अदानीचे मंगळसूत्र बांधणार नाही. अदानीच्या हातात माझ्या माताभगिनींचे मंगळसूत्र अजिबात देणार नाही.

जिवात जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी-शहांच्या हाती जाऊ देणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र मी मोदी-शहांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही.

ही लढाई महाभारतासारखी

येणारी लढाई म्हणजे महाभारत आहे. काwरव शंभर होते आणि पांडव पाच. शकुनीमामा कोण तुम्हाला माहीत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जागा तुम्हाला देणार नाही अशी मस्ती काwरवांची होती. भाजपाचीही हीच भूमिका आहे. सुईच्या अग्रावर जमीन मावणार नाही, पण ते अग्र भाजपाच्या कुठे टोचेल कळणार नाही.

तीन लाख कोटी कुणाला दिले… चौकशी करणार

मुंबई महानगरपालिकेची 90 हजार कोटींची एफडी सरकारने तोडली. पावणेतीन कोटींच्या वर्क ऑर्डर काढल्या गेल्या. कोणती कोणती कामे, कुणाला दिली, रस्त्यात कुणी खडी टाकली याची चौकशी करू असे उद्धव ठाकरे म्हणाले. डिसेंबरमध्ये कर्ज घेण्याची मुदत मिंधे सरकारने आज वापरली असे सांगतानाच, कर्ज काढून दिवाशी साजरी करणार आहात का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

‘भाजपच्या झाडाला दाढीवाला किडा लागला आणि बोंडावर गुलाबी अळी’

अमित शहा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी आता महायुती आणि 2029 ला शत प्रतिशत भाजपा पाहिजे असे कार्यकर्त्यांना सांगितले. म्हणजे मिंध्यांची एक्स्पायरी डेट त्यांनी लिहून ठेवलीय अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. मी शहरी बाबू आहे, शेतीतले काही कळत नाही, पण मला शेतकऩयांचे अश्रू दिसतात, असे प्रत्युत्तरही अमित शहांना उद्धव ठाकरे यांनी दिले.

ते म्हणाले की, सोयाबिनला भाव नाही. संत्र्यांवर डिंक्या रोग येतो. कापसावर किडे येतात. तिला बोंड अळी म्हणतात ती गुलाबी असते. आता ती जॅकेट घालते की नाही ते माहिती नाही. पण तिला गुलाबी बोंड अळी म्हणतात. अमित शहाजी, तुमच्या भाजपच्या झाडाला दाढीवाला किडा लागला आहे आणि बोंडावर गुलाबी अळी पडली आहे. ती पाहा. आम्हाला वाईट वाटतेय की एकेकाळचा आमचा मित्र आतून कुडतरला जातोय, पण त्याला फक्त सत्तेचे पडलेय असे उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रचूडसाहेब, लोकशाही वाचवा…निर्णय घ्या…

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत असल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी, शिवसेनेला न्यायदेवता पावणार की नाही, असा सवाल यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचाही वेध घेतला. चंद्रचूडसाहेब, तुम्हाला इतिहासामध्ये तुमचे नाव अभिमानाने घ्यावे असे वाटत असेल तर लोकशाही वाचवा… लोकशाही वाचवा… लोकशाही वाचवा… तारीख पे तारीख आणि भाषणे देऊ नका. निर्णय घ्या… निर्णय घ्या… असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल माहीत नाही असे चंद्रचूड म्हणाले, पण चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, बाहेर बोलत आहात तेच न्यायालयात बोला आणि न्याय द्या, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलावले, गणपतीची पूजा जरूर करा, पण न्यायमंदिरात तुम्ही येता तेव्हा न्यायदेवतेला अभिमान वाटेल असे करता येईल असे पहा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जगातील अशी एक विचित्र केस आहे की तीन सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपवून गेले, पण कुणीही लोकशाहीला न्याय देऊ शकले नाहीत, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

70 हजार कोटींचा घोटाळा करणारेही बाहेर पडतायंत म्हणे

अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार अशी चर्चा असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, भाजप आणि मिंधे सरकारचा भ्रष्टाचार पाहून आता 70 हजार कोटींचा घोटाळाही लाजू लागलाय. आता 70 हजार कोटींचा घोटाळा करणारेही लाजून बाहेर पडणार आहेत. त्यांना पण लाज वाटू लागली आहे असं ऐकलंय. यांचा घोटाळा मोठा आहे, माझा तर काहीच नाही असे त्यांना वाटू लागलेय असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गायीचा हंबरडा ऐकू येतो, पण कोवळ्या मुलींवर अत्याचार होतात त्याचा ऐकू येत नाही

गायीला राज्यमाता म्हणून मिंधे सरकारने मान्यता दिली. गायीचा हंबरडा तुम्हाला प्रिय आहे, मग कोवळ्या मुलींवर अत्याचार होतात, गोरगरिबांवर अत्याचार होतात, त्यांचा हंबरडा तुमच्या कानावर जात नसेल तर काय अर्थ आहे. पहिले आईला वाचवा मग गायीला वाचवा, हे आमचे हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ महागाई रोखू शकत नाही म्हणून गायीच्या मागे लपत असाल तर ही भाकडगिरी सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

प्रत्येक जिल्हय़ात शिवरायांचे मंदिर उभारणार

मालवणमधील शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेवरून आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराज हे मते मिळवणारे मशीन आहे असे भाजपाला वाटत असेल, पण आमच्यासाठी शिवराय म्हणजे दैवत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. प्रभू श्रीरामांनी दैत्य, राक्षस मारले. तसाच शिवरायांनीही स्वराज्यावर आलेल्या दैत्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतो, असे ते म्हणाले. भाजपाने मालवणात शिवपुतळा उभारला, मते मिळवली. पण नालायकांनो, आठ महिन्यांत पुतळा पडला, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आणि त्या मंदिरात शिवचरित्रातील प्रसंग कोरलेले असतील, अशी घोषणा त्यांनी करताच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषणाने शिवतीर्थ दुमदुमले. महाराजांच्या मंदिरांना विरोध केलात तर महाराष्ट्र बघून घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. देशात पहिल्यांदा आरमार शिवरायांनी उभारले होते, प्रत्येक राज्यात त्यांचे मंदिर उभारले गेले पाहिजे, अशाही भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

भाजपाचा राजकीय शिरच्छेद केलाच पाहिजे

ज्यांना आपले मानले, मोठे केले तेच चालून येत असतील तर ते आपले शत्रूच आहेत असे मानून त्यांना ठेचावेच लागेल अशी शिकवण भगवान श्रीकृष्णाने महाभारतात अर्जुनाला दिली होती. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण ती अमलात आणली छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्यावर चालून येणारा कुणीही असो तो आक्रमक आहे असे समजून त्यांनी त्याचा वध केला. अफझलखानाचा कोथळा काढला. तसाच भाजपाचाही राजकारणात शिरच्छेद करावा लागेल, असे उद्धव ठाकरे यावेळी कडाडले.

शपथ महाराष्ट्राची

मुख्यमंत्री होताना जी शपथ घेतली होती तसा मी वागलो की नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यावर ‘हो’ असा आवाज गर्दीतून घुमला. आज पक्ष नाही, चिन्ह नाही, माझे वडीलही चोरण्याचा प्रयत्न झाला, असे सांगताना आज काही नसताना मी शपथ घेतोय आणि तुम्ही शपथ घ्या, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली त्याला लाखोंच्या जनसागरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्धव ठाकरे यांनी शपथ दिली तेव्हा संपूर्ण शिवतीर्थावरून बुलंद आवाज घुमला…

मी एक स्वाभिमानी महाराष्ट्रप्रेमी म्हणून शपथ घेतो की, 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की, छत्रपती शिवराय व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली ती मी अभेद्य ठेवीन. मी शपथ घेतो की, महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱया दिल्लीतील शाह्यांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहीन. मी शपथ घेतो की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी मी हीच मशाल धगधगत ठेवीन.

फटकारे

मंगल देशा, पवित्र देशा, राकट देशा, कोमल देशा, फुलांच्या देशा असे महाराष्ट्राचे वर्णन आहे ते कायम ठेवायचे, की लाचार आणि गद्दारांच्या देशा असे करायचे याचा विचार करा.

भारतीय जनता पक्ष… लाज वाटली पाहिजे भारतीय म्हणायला. आणि जनतेचा पक्ष तो राहिलेलाच नाही. सगळी चित्रविचित्र भ्रष्टाचारी माणसे एकत्र करून तुम्ही राज्य करत आहात. गद्दारांना आणि चोरांना नेता मानून तुम्हाला आमच्याशी लढावं लागतंय याच्यातच तुमचा पराभव आहे.
न्यायालयाचे दार ठोकून ठोकून आमचे हात दुखायला लागले, पण न्यायमंदिराचे दरवाजे उघडत नाहीत. आम्हाला न्यायदेवता पावणार तरी कशी?
आम्हाला न्याय मिळणार तरी कसा?

हरियाणात 22-23 वर्षांच्या कोवळ्या मुलाचा तथाकथित गोरक्षकांनी पाठलाग करून त्याला गोळ्या घालून मारले. गोमांसाची तस्करी करतोय असा संशय होता. त्याचे नाव आर्यन मिश्रा होते म्हणून कुठेच बातमी आली नाही. तो आर्यन खान किंवा आर्यन शेख असता तर भाजपवाल्यांनी हिंदू खतरे मे है असा आगडोंब उसळवला असता.