भाजप प्रत्येक जागी मतं फोडण्यासाठी एक छुपा समर्थक असलेला अपक्ष उमेदवार उभा करतो आणि ती तिरंगी लढाई असल्याचं चित्रं दाखवलं जातं. पण, ही लढाई तिरंगी नाही तर तिरंग्यासाठीची लढाई आहे, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूर येथील सभेत उपस्थितांना मशाल दिल्लीला पाठवण्याचं आवाहन केलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
भाजपच्या मतफोडीच्या राजकारणावरही त्यांनी टीकेचे आसूड ओढले. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी राज्यभर फिरतोय. टीव्हीच्या माध्यमातून आपल्या सभा, पलिकडच्या लोकांच्या सभा या तुम्ही बघत असाल. तिथे खुर्च्या रिकाम्या असतात. इथे भरगच्च माणसं असतात. त्यांना सगळंच भाड्याने आणावं लागतंय. सभेला माणसं भाड्याने आणताहेत. उमेदवार भाड्याचे घेताहेत. प्रचारक सुद्धा भाड्याने घ्यावे लागताहेत. ही भाजपची वृत्ती आहे. भाजप प्रत्येक ठिकाणी एक थेट उमेदवार देतो. आणि तिथला तिसरा उमेदवार अपक्ष दाखवला जातो. तो वास्तविक भाजपचा छुपा समर्थक असतो. मग तिरंगी लढाई होत असल्याचं चित्र दाखवलं जातं. ही लढाई तिरंगी नाही तर तिरंग्यासाठीची लढाई आहे. त्या तिरंग्याच्या मदतीला आपला छत्रपतींचा भगवा झेंडा मजबुतीने दिल्लीला जाणार आहे. मला शिर्डी मतदारसंघ नवा नाही. गेल्या दिवाळीत मी शिर्डीत आलो होतो. दुष्काळ होता. पिकं करपली होती. शेतकरी खायचं काय विचारत होते. मी चौकशी केली. निळवंडे धरण बनून तयार होतं. पण, मोदींना उद्घाटनाला वेळ नाही म्हणून पाणी सोडलं नव्हतं. म्हणजे शेतकऱ्यांची पिकं करपली तरी चालतील, पण मोदींची तारीख मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचं आयुष्य नासवून टाकलं होतं. मी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरणासाठी दिलेले हजारो कोटी रुपये कुठे गेले. मध्यंतरी मोदी येऊन गेले तेव्हा ते म्हणाले की 50 वर्षं हे धरण खोळंबलं होतं. मध्ये अटलजींचं सरकार येऊन गेलं, मग युतीचं होतं मग देवेंद्र फडणवीसांचं होतं. मग गद्दारी करून सरकार पाडल्यानंतर तेच काम वर्षं सहा महिन्यांत झालं, हे पटतंय का तुम्हाला? म्हणजे दुसऱ्याचं पोर कडेवर घ्यायचं आणि त्याच्यावर आपला शिक्का मारायचा, ही भाजपची वृत्ती आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
‘आपल्या विरोधातली मतं नासवायची कशी हे भाजपला बरोबर कळतं. हे लोकशाही संपवायला निघाले आहेत. हुकूमशाहीविरुद्धचं एकही मत नासता कामा नये. ते मशालीलाच मिळायला हवं. जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांनाही हे पाप करू नका असं मी सांगेन. कारण संपूर्ण देशात हुकूमशाहीविरुद्ध आगडोंब उसळलेला असताना तुम्ही लोकशाहीला अपशकून करू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाला अपशकून करू नका. तो लोकशाहीचा, डॉ. बाबासाहेबांचा घात ठरेल.’
नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा पुरेपूर समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी फटकारे ओढले. ते म्हणाले की, तेलंगणात भाषण करताना नरेंद्र मोदी आधी शिवसेनेला नकली सेना म्हणाले. त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहे. मोदी तुम्ही माझ्याशी बोला. पण माझ्या आईवडिलांबद्दल बोललात तर तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मोदी म्हणाले की बाळासाहेबांची मी नकली संतान आहे.. मी नकली? अरे बेअकली, हा माझा नव्हे तर देवतासमान माझ्या माँचा अपमान आहे, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे. तुमच्यावर कधी आई वडिलांचे संस्कार झाले नसतील. माझ्यावर झाले आहेत. मी सुसंस्कृत घराण्यातला आहे. घराणेशाहीचं तुम्हाला वावडं असेल, आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव सांगायला लाज वाटत असेल. तुम्ही तुमच्या आईला नोटबंदीच्या रांगेत उभं केलंत, मतदानाला रांगेत उभं केलंत. नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलंत. तसा मी निर्दयी नाही. कारण आमचं हिंदुत्व मातृ देवो भव, पितृ देवो भव हे सांगणारं आहे. तुम्ही जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नका. आधी बाळासाहेब बोलण्यापूर्वी हिंदुहृदयसम्राट बोलायला शिका, नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो. जर हिंदुहृदयसम्राट म्हणायला तुमची जीभ वळत नसेल तर माझा महाराष्ट्र ती वळवून दाखवेल. मला नकली संतान म्हणवणाऱ्यांनी पंतप्रधानपदासाठी 2014 आणि 2019 साली माझीच सही घेतली होती. तेव्हा माझी सही घ्यायला लाज वाटली नाही का? 17 तारखेला मोदी शिवतीर्थावर सभा घेतील, त्याआधी बाळासाहेबांच्या समाधीवर जातील, मग भाषणात त्यांच्या आठवणी काढूर ढसढसा रडतील. ही नकली आणि बेअकली माणसं आहेत. मला नकली संतान म्हणत असाल तर उघडपणे सांगतो, तुम्ही नकली आणि बेअकली आहात. तुमची आता बूंदसे गयी है, वह नौटंकीसे नही आने वाली, असा वज्राघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.