मोदींनी महाराष्ट्राकडे जेव्हा आशीर्वाद मागितला तेव्हा महाराष्ट्राने त्यांना तो दिला. पण, आज महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी आक्रोश करतोय तर मोदी इथे फिरकलेही नाहीत. त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ महत्त्वाचा आहे. तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ चित्ता कॅम्प येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
उपस्थितांना मतदानाचं आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जी लढाई आपण लढतोय ती माझी नाही. कोणत्याही नेत्याची किंवा पक्षाची लढाई नाही. ही तुमची लढाई आहे. आपल्या देशाची, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची, लोकशाहीची लढाई आहे. ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल. मी मैदानात उतरलो आहेच. पूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय. लोकं निराशा झटकून तयारीत बसलेत. मोदींनी 400 पारचा नारा दिला आहे, तेव्हा तुम्ही काय नारा दिला? अबकीबर भाजप तडिपार. ज्या प्रकारे मोदी बोलतात, ती भाषा देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडी शोभत नाही. मोदी ओडिशात गेले आणि त्यांनी नवीन पटनायक यांना आव्हान दिलं. नवीन पटनायक यांनी न पाहता त्यांच्या राज्यातील जिल्ह्यांची कॅपिटॉल सांगावेत, असं ते आव्हान होतं. पंतप्रधानांना मी काही आव्हान देणार नाही कारण ते विश्वगुरू आहेत आणि मी सामान्य माणूस. त्यामुळे आव्हान देतोय हे सांगणं चुकीचं ठरेल. तुम्ही नवीन पटनायकांना सांगितलं की कुठलाही कागद हातात न धरता सांगितलं होतं, मी सांगतो तुम्ही तुमच्या हातात 2014 मध्ये संपूर्ण देशात वाटलेलं जुमलापत्र घ्या आणि त्यातली किती वचनं तुम्ही पूर्ण केलीत सांगा. मध्यंतरी लसणाची किंमत 400 पार गेली होती. मोदींची चारशे पारची घोषणा ऐकून लसूण लाजलं आणि त्याला वाटलं या जुमलेबाजासोबत काय बरोबरी करायची.. लगेच भाव उतरले, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा उसळला.
‘मी इथे प्रथमच आलो कारण एक भिंत आपल्यात होती. तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की मी हिंदुत्व सोडलं की नाही? माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही? माझ्या हिंदुत्वात आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे की नाही? आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. रोजीरोटी देणारं आहे. घर जाळणारं हिंदुत्व नाही, ते मला मंजूरही नाही. मोदी म्हणतात अदानी अंबानींनी राहुल गांधींना पैसा पुरवला. अहो पण सगळ्या देशाची सत्ता तर तुमच्या हातात होती ना? ईडी-इन्कम टॅक्स-सीबीआय आहेत. तेव्हा ते काय ठेल्यावर बसले होते का? चुना लावत होते का? मोदींनी नोटाबंदी करूनही जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राहुल गांधींना काळं धन पुरवलं गेलं, याचा अर्थ नोटबंदी पूर्णपणे फसली.’
‘तुम्ही महाराष्ट्राकडे आशीर्वाद मागितला, तेव्हा महाराष्ट्राने तुम्हाला आशीर्वाद दिला. पण, तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? राज्यातला शेतकरी कष्टकरी आज आक्रोश करतोय. आजही मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. तिथे मोदी किंवा गद्दार मुख्यमंत्री जाताहेत का? त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ महत्त्वाचा आहे. तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा हीच मोदींची नीती आहे. आम्ही मुंबईच्या पर्यटन विकासासाठी कोस्टल रोड बनवण्याचं स्वप्न पाहिलं. त्याचं क्रेडिटही तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला. पण सर्वांना सत्य ठाऊक आहे. जिजामाता उद्यानात पेंग्विन आणले म्हणून तुम्ही रान उठवलंत. आता त्याच पेंग्विनना मुलं झाली, तेव्हा गुजरात – यूपी ती मुलं आम्हाला द्या सांगतात. पुन्हा इथेही तेच सुरू आहे. मूल दुसऱ्याचं पण आपल्याला हवं. काही विचार नाही, सगळं यांना रेडीमेड हवं.’ अशी कडाडून टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.