निवडणुकीच्या आखाड्यात गद्दारांना आडवे करा! उद्धव ठाकरे यांचे खणखणीत प्रतिपादन

शिवसेना ही मर्दांची संघटना आहे, हुकूमशाहीविरुद्ध शिवसेना दंड थोपटून लढत असताना पळपुटे नामर्द पळून जाताहेत आणि तरणेबांड मर्द शिवसेनेत येत आहेत. आता निवडणुकीच्या आखाडय़ात महाराष्ट्रातील गद्दारांना आडवे करा, असे खणखणीत आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगली येथील डबल ‘महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. आपली छाती आज अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली आहे सांगता येत नाही, पण या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेविरुद्ध लढण्याची कुणाची छाती होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण लहान असताना हिंद केसरी मारुती माने, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला यायचे, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितली. चंद्रहारला पाहून आज ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आजदेखील कायम आहे, आज डबल महाराष्ट्र केसरी पक्षात आले, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.
सांगली लोकसभेच्या जागेसाठी चंद्रहार पाटील हे इच्छुक आहेत. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी काहीतरी संकेत द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यावर जनतेने संकेत दिल्यानंतर पुढे काय संकेत द्यायचे असे सांगत, गदा आणि मशाल केवळ मर्दांच्या हातात शोभतात आणि हीच गदा आणि मशाल घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या वेळी ‘अबकी बार चंद्रहार’ अशा घोषणांनी आणि ढोलताशांच्या गजराने मातोश्रीचा परिसर दुमदुमला.

लवकरच सांगलीत येणार

लवकरच आपण सांगलीत येऊ. सांगलीत प्रचाराला नक्कीच येईन, पण विजयी सभेला बोलवाल असे वचन द्या, असे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील आणि उपस्थित समर्थकांना सांगितले. विजय मिळवावाच लागेल, त्याची जबाबदारी मी घेतलीच आहे, तुम्हीही जबाबदारी घेणार का असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांनी जबाबदारी घेतली साहेब असे म्हणत एकच जल्लोष केला.

चंद्रहारला कुणीही रोखू शकत नाही – संजय राऊत
आतापर्यंत राजकारण्यांचे, अभिनेत्यांचे पक्षप्रवेश खूप झाले, पण आज देशाच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचे वैभव असलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेतील प्रवेश हा एक जबरदस्त पक्षप्रवेश आहे असे याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले. कुस्तीचे मैदान गाजवणारे, सांगली व आसपासच्या परिसरात कुस्ती लोकप्रिय करणारे चंद्रहार पाटील कुस्ती क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आहेत, अशी प्रशंसा संजय राऊत यांनी केली. चंद्रहाराची गदा आता शिवसेनेच्या मशालीबरोबर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, चंद्रहारला आता कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, साजन पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

येणाऱया निवडणुकीत पहिला विजयी निकाल सांगलीतून येईल – चंद्रहार पाटील
एका शेतकऱयाच्या मुलाला शिवसेनेने सांगली लोकसभेच्या दृष्टीने जो मानसन्मान दिला त्याबद्दल तमाम कुस्तीगीरांच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो अशा भावना या वेळी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केल्या. हा आपलाच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या मुलांचा सन्मान असून येणाऱया लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातला पहिला विजयी निकाल सांगली जिह्यातला असेल असे वचन चंद्रहार पाटील यांनी या वेळी दिले. या वेळी चंद्रहार यांनी उद्धव ठाकरे यांना गदा भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

अबकी बार चंद्रहार
सांगलीतून 500 गाडय़ांच्या ताफ्यातून शेकडो समर्थकांसह वाजत-गाजत चंद्रहार पाटील मुंबईत मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. अबकी बार चंद्रहार… शिवसेना झिंदाबाद… अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सांगलीतून चंद्रहार यांना संधी देण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. या सर्वांचेच उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आणि सांगली लोकसभा संघटकपदी चंद्रहार यांची नियुक्ती जाहीर केली.

डबल ‘महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील शिवसेनेत
शिवसेना प्रवेशानंतर चंद्रहार पाटील यांनी गदा भेट देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी शिवसेना नेते – खासदार संजय राऊत, उपनेते नितीन बानगुडे-पाटील, साजन पाचपुते उपस्थित होते.