मत जनतेचं आणि किंमत मित्रांना हे चालणार नाही! उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

राजेश पोवळे / अजित शिर्के

मत जनतेचं आणि किंमत भाजपच्या सुटाबुटातील मित्रांना… हे यापुढे चालणार नाही. पुढच्या पिढय़ा हुकूमशहाच्या हातात देण्याचे पाप करू नका. त्यासाठी आता आपल्याला हिंमत दाखवावीच लागेल. मतदार राजा जागा रहा. रात्र तर वैऱयाची आहेच… पण झोपलात तर दिवससुद्धा वैऱयाचे येतील, असा धोक्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. लढणार आणि जिंकणारच, असा नारा त्यांनी छत्रपती शिवरायांची राजधानी रायगडातून दिला तेव्हा तमाम जनतेने वज्रमूठ उंचावत ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.

पेण, अलिबाग आणि रोह्याच्या शिवसंवाद दौऱयानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या सभेचे वादळ पोलादपूर, म्हसळा आणि माणगावात घोंघावले. गावाखेडय़ातून, वाडय़ापाडय़ातून आलेल्या शिवसैनिक आणि जनतेच्या तुडुंब गर्दीने तीनही शहरातील मैदाने ओव्हरपॅक झाली होती. पहिली सभा पोलादपूर येथील देवीची सहाण येथे झाली. दुसरी सभा म्हसळय़ातील दिघी रोड मैदान तर तिसरी सभा माणगावातील गांधी मैदान येथे झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभारावर आणि गद्दारांच्या चाटूगिरीवर जबरदस्त प्रहार करतानाच अब की बार मोदी सरकार तडीपारचा एल्गार केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, इथल्या गद्दार खासदाराला अनेक प्रश्न पडले की, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी होईल का?, लोकं जमतील का? पण आज रायगडात झालेल्या तीन सभांची गर्दी पाहून मला शिवसेनेच्या 1966 साली झालेल्या पहिल्या दसऱया मेळाव्याची आठवण झाली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी पहिला मेळावा शिवतीर्थावर घेण्याची घोषणा केली तेव्हा अनेकांनी इतकं मोठं धाडस करू नका असा सल्ला दिला. पण शिवसेनाप्रमुख म्हणाले, मेळावा होईल तर शिवतीर्थावरच… आणि शिवतीर्थ लाखालाखाच्या गर्दीने भरले. माझ्या धमन्यात त्यांचेच रक्त आहे. ही गर्दी त्या गद्दार खासदाराला दाखवा.

यंत्रणांचा वापर करून विरोधकांना छळणाऱया मोदी सरकारच्या कारस्थानी कारभाराचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, जे तुमच्या सोबत येत नाहीत, विरोध करताहेत, तुमच्या विरोधात लढताहेत त्यांच्याविरोधात एका मानसिकतेने पिसाळून ईडी, सीबीआय लावता. अनिल परब, किशोरी पेडणकर, रवीद्र वायकरांच्या घरी माणसं पाठवता. संजय राऊत यांच्या भावाचीही चौकशी लावली आहे. झोपडीतल्या शिवसैनिकांना पत्र पाठवली जात आहेत. का… तर तुमच्या तोतल्याने आरोप केले म्हणून? पण या तोतल्याने ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यापैकी किती जणांच्या चौकशा सुरू आहेत? जुन्या केसेस काढून माझ्या साध्या लोकांना त्रास देत आहेत. इन्कम टॅक्सच्या नोटिसी पाठवताय… मग तुमच्याकडे जे टोणगे आणि बाजारबुणगे आले आहेत त्यांच्या चौकशा का करत नाहीत? जे सीमा सुरक्षा दलाचे जवान त्यांच्याकडे धाडी टाकायला गेले तेच त्यांना संरक्षण देऊन त्यांच्या घरी घरी झाडू मारताहेत. ही असली हुकूमशाही आता संपवावीच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशभक्त मुस्लिम आमचे भाऊ आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी शिवसेना नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना नेते भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, सहसंपर्कप्रमुख आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रचारयंत्रणा प्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, विष्णू पाटील, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, हनुमंत जगताप, महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे, पोलादपूर शहरप्रमुख नीलेश सुतार, तालुका संघटक अजय सलागरे, शहर संघटक अमोल भुवड, नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्नील भुवड, तेजश्री गरुड, महाड विधानसभा संघटक सारिका पालकर, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, श्रीवर्धन संपर्कप्रमुख सुजीत तांदळेकर, उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, अनिल काप, मुस्लिम-मराठी महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर सईद अहमद कादरी, शहरप्रमुख अजित तारलेकर, उपशहरप्रमुख सागर गांधी, युवा सेना शहर अधिकारी अजिंक्य जाधव, माणगाव शहर संघटक अनिल सोनार, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, उपशहरप्रमुख इब्राहिम करेल, बळीराम घाग यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

गद्दार खोक्यांसाठी पळाले – जाधव
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर युती करून हिंदुत्व सोडल्याची बोंब करत चाळीस जणांनी गद्दारी केली. मात्र हिंदुत्व किंवा विकासासाठी नाही तर खोक्यांसाठी त्यांनी फितुरी केली आहे. बजेटमध्ये जी तरतूद होते. त्याचे पैसे टक्केवारीतून गद्दारांना मिळतात असा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. लोकसभा निवडणुकीतही अनंत गीते यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ, असे वचनही जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

गलिच्छ राजकारण -अनंत गीते
आताची गद्दारी ही वैयक्तिक नसून भाजप पुरस्कृत आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण सुरू केले. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली.. त्यामुळे फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड संताप, तिरस्कार असून येणाऱया निवडणुकीत जनताच यांना धडा शिकवेल असा इशारा शिवसेना नेते अनंत गीते यांनी दिला.

मुंबई-गोवा महामार्ग दोनशे वर्षांत तरी पूर्ण होईल काय?
कोस्टल रोडच्या उद्घाटनाला जसे तुम्ही येणार आहात तसाच माझ्या मुंबई-गोवा महामार्गावरही एक फेरी कधीतरी मारा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना लगावला. मुंबईचा कोस्टल रोड कोरोनाच्या संकटातही मुंबई महापालिकेने अथकपणे काम करून पूर्ण करून दाखवला. म्हणून तुम्ही उद्घाटनाचा नारळ फोडायला येताय. पण केंद्र सरकार जो मुंबई-गोवा रस्ता करतो आहे त्याचे काय? गडकरी बोलले होते. दोनशे वर्षे या रस्त्याला खड्डे पडणार नाहीत. अहो खड्डे कसे पडणार. कारण दोनशे वर्षे हा रस्ताच होणार नाही. दोनशे वर्षांत तरी हा रस्ता पूर्ण होणार काय? असे मोदींनी गडकरींना विचारावे. कारण तुमची मुदत आता संपत आली. आणि राजभवनच्या परिसरात ज्या शिवस्मारकाचे भूमिपूजन तुम्ही केले ते कधी पूर्ण करणार हे तुमच्या एक फूल दोन हाफ ना विचारा, असे तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले.

शौकत अली हजकाने यांच्या घरी उद्धक ठाकरे यांचा पाहुणचार
म्हसळय़ाच्या दिघी मोहल्यात आज उत्साहाला उधाण आले होते. साक्षात आपले साहेब…उद्धव ठाकरे.. शौकत अली हजवानी यांच्या घरी पाहुणचाराला येणार म्हणून प्रत्येकाच्या चेहऱयावरील आनंद ओसडून काहत होता. टळटळीत उन्हात पोलादपूर येथील तुफानी सभा गाजवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ताफा पुढच्या सभेसाठी म्हसळय़ाच्या दिशेने निघाला… वाटेत म्हसळा येथील दिघी मोहल्यात उद्धव ठाकरे यांची गाडी कट्टर शिवसैनिक शौकत अली हजवाने यांच्या घरासमोर थांबली. यावेळी स्वागतासाठी लोटलेल्या हजारो मुस्लिम बांधकांनी ‘शिवसेना झिंदाबाद…’, ‘उद्धव ठाकरे यांचा विजय असो…’ अशा घोषणा दिल्या.

नॅपकीनवाल्याचा नॅपकीनच पिळून टाकेन
उद्धव ठाकरे यांनी गद्दार आमदार भरत गोगावले यांचा समाचार घेतला. रायगडची भूमी संतांची आणि वीरांची आहे. त्या भूमीत भगवा बाजूला ठेवून नॅपकीन फडकवणारे खूप झालेत. ते मंत्रीही झाले नाहीत आणि स्वप्नातले पालकमंत्रीही झाले नाहीत. शिवलेली नवीन जॅकेट जुनी झाली. हा नॅपकीनवाला इथल्या उद्योजकांनाही धमक्या देतोय, छळतोय असे मला कळले आहे. माझे सरकार येऊ दे मग बघतो त्याचं काय करायचं. त्याचा नॅपकीनच पिळून टाकतो असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच गर्दीतून गद्दाराला आपटणारच, असा आवाज घुमला.

मोदीजी, तुम्ही मुंबईत याल तेव्हा तुमच्या बाजूला जे एक फुल दोन हाफ बसतील त्यांचं या प्रकल्पात काडीचंही योगदान नाही हे लक्षात ठेवा. ही कल्पना सर्वस्वी आमची होती. कोस्टल रोड प्रकल्प मुंबई महापालिकेच्या पैशातून साकारला आहे. अरे नालायकांनो, तुम्ही मुंबईसाठी काहीच करत नाही.
पक्ष चोरणारे, फोडणारे, समाजात भेदभाव करणारे तुमचे हिंदुत्व आहे काय? या असल्या हुकूमशाहीला मी हिंदुत्व मानत नाही.
मतदारराजा, जागा रहा! रात्र वैऱयाची आहेच, पण झोप घेतलीस तर दिवससुद्धा वैऱयाचे येतील.