शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, उत्सुकता वाढली

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपप्रणित महायुतीचा दारूण पराभव झाला. तर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा दणदणीत विजय झाला. या विजयाने महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठा उत्साह आहे. या विजयानंतर प्रथमच तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उद्या एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उद्या एकत्र पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत काय मोठी घोषणा होणार? याची उत्सुकता वाढली आहे.

पत्रकार परिषद कुठे आणि किती वाजता?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांच्या नेत्यांची ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद मुंबईत उद्या दुपारी दोन वाजता होणार आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे तिन्ही प्रमुख नेते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याची ही पत्रकार परिषद होत आहे. यामुळे पत्रकार परिषदेत कोणता मोठा निर्णय आणि घोषणा होणार? याची उत्सुकता आहे.